राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...
शिक्रापूर : सध्या पुणे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढत आहे. असे असताना शिरुर तालुक्यात काही ठिकाणी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस ओलांडून चाळीशीजवळ येताना दिसत आहे. त्यामुळे शिरुरकरांची लाहीलाही झाली असून, नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत असतानाच भरदिवसा अनेक रस्ते ओस पडून रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.
महाराष्ट्र राज्यात चांगलाच उन्हाळा जाणवू लागलेला आहे. असे असताना कित्येक ठिकाणी पाण्याची पातळी देखील खालावली आहे. काही ठिकाणी तीव्र उन्ह जाणवत असून, पुणे जिल्ह्याचे कमाल तापमान 40 अंश असताना शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात देखील कमाल तापमान चाळीशीजवळ येऊ लागल्याने नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी उष्णतेमुळे नागरिकांची लाहीलाही होत असल्यामुळे नागरिक घरात बसणे पसंत करत असल्याने नेहमी गजबजलेले रस्ते व बाजारपेठा देखील देखील ओस पडल्याचे दिसत आहे. भरदिवसा रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे, तर वातावरणात देखील मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. असे असताना या महिन्यात आजचे तापमान सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्याच्या तापमानात वाढ होण्यास सुरूवात
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनीही वाढत्या उन्हात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तापमानाने ओलांडला 40 अंश सेल्सिअसचा उंबरठा
यंदाच्या वर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्याच्या तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडल्याचे पाहिला मिळाले होते. जिल्ह्यातील काही भागांत तापमान 38 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर आता काही अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आहे.
शहराच्या तापमानातही होतीये वाढ
गेल्या काही दिवसांत शहरातील तापमानातही वाढ झाली आहे. यामुळे उष्माघाताचा धाेका निर्माण झाला असून, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे महापािलकेच्या आरोग्य विभागाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. उन्हात शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.