चैत्री यात्रेसाठी मंदिर प्रशासन सज्ज; भाविकांच्या सुविधेसाठी तब्बल 1200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
पंढरपूर : चैत्री यात्रा दरवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी या दिवशी भरते. यंदा चैत्री यात्रा मंगळवारी (दि.8) असून, या यात्रा कालावधीत सुमारे 2 ते 3 लाख भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शनाबरोबरच आवश्यक सोयी-सुविधा मंदिर समितीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येणार असून, त्याबाबतचे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये नवमीला श्रीरामनवमी जन्मोत्सवानिमित्त श्री विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) ह.भ.प. श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर यांचे कीर्तन, ह.भ.प.आजरेकर महाराज पंढरपूर यांचा व्दादशीला नैवेद्य, त्रयोदशीला, ह.भ.प.गुरू बाबासाहेब आजरेकर महाराज, पंढरपूर यांचे कीर्तनाची परंपरा असून, एकादशीला पहाटे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची नित्यपूजा अनुक्रमे सदस्य ह.भ.प.शिवाजीराव मोरे व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते सपत्नीक संपन्न होत आहे.
आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिका यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यासह, सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक 100 नग सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाईल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलीसी इ. व्यवस्था करण्यात आली आहे.
वैद्यकीय पथकासह दोन अद्ययावत रूग्णवाहिका सज्ज
आरोग्य व्यवस्थेसाठी पत्राशेड येथे तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष, उपजिल्हा रूग्णालयामार्फत दर्शनमंडप येथे आयसीयू तसेच वैष्णव चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा व मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्ययावत रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येत आहेत.
संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत अन्नदान सुरू राहणार
स्वच्छतेसाठी मंदिर, दर्शनमंडप, तुकाराम भवन येथील स्वच्छता मंदिर कर्मचाऱ्यांमार्फत व नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा आदी ठिकाणची स्वच्छता आउट सोर्सिंग पद्धतीने करण्यात येत आहेत. या कामी स्वकाम सेवा आळंदी व संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आळंदी या स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येत असून, स्वच्छतेसाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. तसेच अन्नछत्रामध्ये दुपारी बारा ते दोन व संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत अन्नदान सुरू राहणार असून, दर्शनरांगेत दशमी, एकादशी, द्वादशीला लिंबू सरबत, मठ्ठा व तांदळाची अथवा शाबुदाणाची खिचडी वाटप करण्यात येणार आहे, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.