राज्यातील तब्बल 9 लाख 'लाडक्या बहिणीं'ना मिळणार नाहीत पैसे; 'या' खासदाराने केलं मोठं विधान
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. यामधून दर महिन्याला महिलांना दीड हजार रुपये देण्यात आले होते. निवडणूकीपूर्वी सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा करण्यात आले. त्याचबरोबर निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार देखील करण्यात आला. तसेच निवडून आल्यानंतर ही रक्कम 2100 रुपये केली जाईल असे देखील महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. आता लवकरच ही योजना बंद पडणार असल्याचे वक्तव्य राजकीय नेत्याने केल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला आहे.
महायुती सरकारकडून दर महिना 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र हे पैसे पुढील राज्याच्या अर्थसंकल्पानंतर दिले जातील असे देखील सांगण्यात आलेले आहे. महायुती सरकारकडून डिसेंबर महिन्याचे दीड हजार रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र यापूर्वी देखील योजना विधानसभा निवडणुकीपुरता जुमला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर आता माजी खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी ही योजना लवकरच बंद पडणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले विनायक राऊत?
ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरुन निशाणा साधला आहे. विनायक राऊत म्हणाले की, महाराष्ट्र कर्जामध्ये डुबलेला आहे, त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळण्याचं आव्हान अजित दादा कसं पेलणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकींपर्यंत लाडकी बहीण योजनेचा प्रयोग ते नक्की करतील. त्यानंतर ही योजना बंद पाडतील. या योजनेचा डोलारा सांभाळणे जिकरीचे काम असल्याचा आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की ही योजना बंद करण्यात येणार असल्याचा मोठा दावा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
त्याचबरोबर राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणूका होणार असून बृन्हमुंबई महानगरपालिकेसाठी सर्वांची मोर्चेबांधणी सुरु आहे. याबाबत माजी खासदार विनायक राऊत म्हणाले की, मुंबई महापालिकेवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा डोळा आहे. त्यांना महापालिका हडप करायची आहे. मात्र मुंबईकर जनता जागृत आहे. कोणत्याही परिस्थितीत या लुटारूंच्या हातात मुंबईकर जनता महापालिका देणार नाही. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना उबाठा महापालिकेत निवडून येईल, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
माजी खासदार विनायक राऊत यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे कोण आहे, हे दिसून आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची गांभीर्याने दखल घेतील याची मला खात्री आहे. पण मागच्या दोन महिन्यात ज्या पद्धतीने हत्या होताहेत, लैंगिक अत्याचार, खून होताहेत, दरोडे पडताहेत, त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झालेली आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही, गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत, असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.