सुरेश धस आणि प्राजक्ता माळी वादावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. बीडच्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राजकारण ढवळून निघाले असून नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेमधील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वपक्षीय मूक मोर्चा देखील काढण्यात आला होता. या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीते नाव समोर आले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव भाजप नेते आमदार सुरेश धस यांनी घेतल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच सुरेश धस यांच्या विधानाचा जोरदार निषेध करत माफी मागवी असे देखील अभिनेत्री प्राजक्ता माळी अशी मागणी केली. आता या प्रकरणावर शरद पवार गटाचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी भाष्य केले असून सुरेश धस यांच्या विधानात काही चुकीचे दिसले नाही, असे म्हटले आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार अमोल कोल्हे यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “आमदार सुरेश धस यांचे विधान मी ऐकले. त्यांनी इव्हेंट पॉलिटिक्सबद्दल सांगत असताना त्यावर वक्तव्य केले होते. त्यामुळे त्या विधानाला आणखी वेगळे काही वळण देण्याची गरज नाही, असे मला वाटते. प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद मी अद्याप पाहिली नाही. पण कोणत्याही पुराव्याशिवाय कुणावरही शिंतोडे उडवता कामा नये. सुरेश धसांच्या विधानातून मला जेवढे समजले त्यानुसार त्यांनी फक्त इव्हेंटबाबत वक्तव्य केले होते. या पलीकडे जर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न झाला असेल तर तो अभिनेत्रीच काय तर कुणाच्या बाबतीतही होता कामा नये”, अशी प्रतिक्रिया डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “सरकारमधील एका मंत्र्यावर सातत्याने असे आरोप होत असतील आणि संशायचे धुके बाजूला होत नसेल तर एकूणच सरकारच्याच कार्यप्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायलाच हवा. नेत्यांनी काही नावे समोर आणली असली तरी यात जे कोण आरोपी असतील त्यांना शिक्षा व्हायलाच हवी,” अशी अपेक्षा अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बीडमधील मूक मोर्चावर प्रतिक्रिया देताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “बीडमध्ये निघालेल्या मोर्चातून हेच दिसते की, सर्वसामान्य जनता जागरूक आहे. राजकीय आशीर्वादापोटी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर आता जनता ते सहन करणार नाही. लोकांच्या मनात जे संशायचे धुके निर्माण झाले आहे, ते दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला हवा. गृह मंत्रालय त्यांच्याकडे आहे. त्यांनीच हे शंकाचे निरसन करायला हवे,” असेही ते म्हणाले.