फोटो सौजन्य- गुगल
‘संकल्प दहीहंडी उत्सव संकल्प नव्या उंचीचा!’ या ब्रीदवाक्यानुसार वागळे इस्टेट परिसरात गेल्या दोन दशकांपासून अविरत सुरू असलेल्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी महोत्सवाचे यंदाचे २१ वे वर्ष मोठ्या दिमाखात साजरे होणार आहे. यंदा दहीहंडीचा जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी तब्बल २१ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तसेच १० थर लावणाऱ्या पथकास १० लाख आणि ठाण्यात प्रथम ९ थर लावणाऱ्या पथकास ५ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार असल्याची घोषणा आमदार रविंद्र फाटक यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेस नगरसेवक राजेंद्र फाटक, नगरसेवक दीपक वेतकर, स्वामी समर्थ इव्हेंटचे प्रमुख अमीर हडकर आणि प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक उपस्थित होते.
शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून वागळे इस्टेट येथील रघुनाथ नगर, संकल्प चौक येथे संकल्प प्रतिष्ठानचा दहीहंडी महोत्सव रंगणार आहे. उत्सवाच्या उत्साहासोबतच गोविंदांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आयोजकांनी चोख सुरक्षा नियोजन केले आहे. थर रचणाऱ्या गोविंदांसाठी हेल्मेट, सेफ्टी रोप, सुरक्षा जॅकेट आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदाच्या महोत्सवात मुंबई, ठाणे आणि उपनगरांतील ५०० हुन अधिक नामांकित गोविंदा पथके सहभागी होणार असल्याने वागळे इस्टेटमध्ये थरांचा महाथरार अनुभवायला मिळणार आहे. मुख्य दहीहंडी उत्सवाबरोबरच ४ सप्टेंबर रोजी रात्री विशेष सेलिब्रिटी दहीहंडीचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा आमदार रविंद्र फाटक यांनी केली.
गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी यंदा मनोरंजनाची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. अमीर हडकर यांच्या स्वामी समर्थ इव्हेंट आणि मराठी बझ यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामांकित कलाकार, गायक आणि नर्तक या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे थरांचा थरार, गोविंदांचा उत्साह आणि मनोरंजनाची मेजवानी असा तिहेरी अनुभव यंदाच्या संकल्प दहीहंडी महोत्सवात पाहायला मिळणार आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






