डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी पर्यंत रस्ते सिमेंट काँक्रीटंट करण्याचे काम गेली दोन वर्षे रखडले आहे. पावसाळा तोंडावर आला तरी काम ठप्प झाले आहे.केडीएमसी आणि एम एम आर डी ए प्रशासनाच्या कासव छाप गतीच्या कारभाराच्या निषेधार्थ गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीच्या वतीने रविवारी डोंबिवलीच्या श्रीधर म्हात्रे चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
एम एम आर डी ए कडून 2024 मध्ये 250 मीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम मंजूर झाले आहे .गेल्या वर्षी मे जूनमध्ये या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली .मात्र त्या वेळी अयोग्य नियोजन व अरुंद रस्त्यामुळे तेथे दोन अपघात घडले. त्यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एका रहिवाशी जखमी झाले. अपघात वाढू लागल्याने गरीबाचा वाडा उत्कर्ष समितीने याबाबत आवाज उठल्यानंतर या रस्त्याचे काम पावसाळ्यात थांबविण्यात आले होते.
गरीबाचा वाडा श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी पर्यंतचा रस्ता खूप अरुंद आहे.या रस्त्यावर एकाच वेळी समोरा समोर दोन मोठी वाहने आली तर वाहतुकीची कोंडी होत असते . गरिबाचा वाडा परिसरात अनेक मोठमोठे गृहनिर्माण कॉम्प्लेक्स उभे राहिले असल्याने लोकवस्ती गेल्या २० ते २५ वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.लोकवस्ती सोबत वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे . त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे,पावसाळ्यानंतर या रस्त्याचे रुंदीकरण करून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीने महापालिकेकडे केली होती, ती मागणी तत्कालीन महापालिका आयुक्त इंदू राणी जाखड मान्य केली.
पावसाला संपताच पुन्हा हे काम तातडीने सुरू होणे अपेक्षित होते.मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.प्रशासनाची टोलवाटोलवी आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे गेल्या वर्षभरात त्या रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही.त्यामुळे गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीने केडीएमसी व एम एम आर डी ए प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा दिला होता.
वास्तविक या रखडलेल्या रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर त्वरित सुरू होणे गरजेचे होते. मात्र ते उशिराने सुरू झाले. आत्ता मे महिना अर्धा संपला असून दरम्यानच्या काळात केवळ रस्ता रुंदीकरण व दोन्ही बाजूचे गटार बांधकाम इतकेच काम झाले आहे. रस्त्यामध्ये अडथळा ठरणारे झाडे, विद्युत पोल विद्युत दिवे ट्रान्सफॉर्मर अद्याप हलविण्यात आलेले नाहीत. जलवाहिन्या स्थलांतरित केल्या नाहीत.पावसाला तोंडावर आला तरी केडीएमसी व एम एम आर डी ए प्रशासनाची टोलवाटोलवी आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे गेल्या वर्षभरात त्या रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही.त्यामुळे गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीने केडीएमसी व एम एम आर डी ए प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
हाच रस्ता पुढे रिंग रोडला जाऊन मिळणार आहे,त्यामुळे हा रस्ता महत्वाचा आहे.या अरुंद रस्त्यावरून पाण्याचे टँकर, केडीएमसीची आरसी कचरा गाडी, मल्टी एक्सल डंपर ,शालेय बसेस ,रेडी मिक्स सिमेंटची वाहतूक करणाऱ्या गाड्या अशी अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते .पावसाळ्या पूर्वी रस्त्याचे काम झाले नाही तर आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर पुन्हा तेथे अपघात घडण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एका महिलेचा डंपर खाली चिरडून मृत्यू झाला होता तर एका ज्येष्ठ नागरिकाचा हात फक्चर झाला होता.या सर्व पार्श्वभूमीवर गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीने रविवारी निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने आमदार रविंद्र चव्हाण यांनी त्याची दखल घेतली.समितीच्या पदाधिकारी यांना बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा केली.त्यावेळी समितीने आंदोलन आयत्या वेळी मागे घेतले जाणार नाही.आपण आंदोलनाच्या ठिकाणी या.प्रत्यक्ष रस्त्याची दुरावस्था पाहा,अशी विनंती केली.
त्यानुसार रविवारी सकाळी आंदोलन स्थळी आमदार रविंद्र चव्हाण पोहोचले .त्यांनी केडीएमसी व एम एम आर डी ए अधिकारी यांच्या समवेत रस्त्याची पाहणी केली.त्यानंतर चर्चा करून तांत्रिक अडचणी त्वरित दूर करून रस्त्याच्या कामाला त्वरित सुरूवात करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच या रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासा बद्दल आमदार चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली.तसेच यापुढे या कामावर जातीने लक्ष घालून काम लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली.यावेळी गरिबाचा वाडा उत्कर्ष समितीचे अध्यक्ष विवेकानंद धवसे . उपाध्यक्ष युवराज सकपाळ,वैभव केसरकर, विजय राऊत,दीपेश सोनी ,संदीप सालेकर बारी जयवंत ,श्याम बोलके, सुनील पांचाळ,प्रतीक म्हामुणकर,,विकास शिर्के आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.