एकनाथ शिंदेंबाबत युनुस शेख यांचं मोठं विधान
ठाण्याच्या राजकारणात सध्या गोंधळाचे वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे. ठाकरे सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील राजकारण तापलेले असतानाच आता पुन्हा एक अजब राजकीय प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील ‘मुंब्रा हरा कर देंगे’ फेम एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांची एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित एका पदावर नियुक्ती झाली आहे. या न्यूकीमुळे ठाण्यातील राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.
युनुस शेख यांना एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित केबल संघटनेत कळवा-मुंब्रा परिसराचं अध्यक्षपद मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, आपण अद्याप एमआयएममध्येच असून शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, असं युनूस शेख यांनी स्पष्ट केलं आहे.
युनूस शेख यांच्या म्हणण्यानुसार, “केबल आणि इंटरनेटचा व्यवसाय हा त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा व्यवसाय आहे. केबल व्यावसायिकांसाठी एमआयएमची स्वतंत्र संघटना नसल्याने आपण केबल ऑपरेटरच्या संघटनेशी जोडले गेलो,” असं त्यांनी सांगितलं.
“या संघटनेत कळवा-मुंब्रा परिसराचं अध्यक्षपद मिळालं असलं, तरी त्याचा अर्थ आपण शिवसेनेत प्रवेश केला असा होत नाही. पक्षप्रवेश करायचा असता, तर एकनाथ शिंदे यांच्या हातून थेट नियुक्तीपत्र स्वीकारलं असतं,” असं त्यांनी म्हटलं.
युनुस शेख यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचं कौतुकही केलं. “एकनाथ शिंदे साहेब हे सर्वांचेच बॉस आहेत, आमचेही बॉस आहेत. शिंदे यांच्यासोबत गेल्यास फायदाच होईल.” असं मत व्यक्त करत त्यांनी शिंदे यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधांचाही उल्लेख केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबाचे एकनाथ शिंदे यांच्याशी सुमारे ४० वर्षांपासून संबंध आहेत. संकटाच्या काळात एकनाथ शिंदे आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मदत केल्याचंही त्यांनी सांगितलं.
“शिवसेनेचं नियुक्तीपत्र मिळालं किंवा पक्षाचं चिन्ह असलेला गमछा घातला, म्हणजे पक्षप्रवेश झाला असं होत नाही. एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले जुने संबंध आणि केबल व्यवसायामुळे आपण संघटनेशी जोडले गेलो, शिंदे यांनी भविष्यात आणखी एखादी जबाबदारी दिल्यास त्याबाबत विचार करू,” असं त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, युनुस शेख यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यात राजकीय चर्चांना सुरुवात झाली असली, तरी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा नाकारला आहे. त्यामुळे त्यांच्या संघटनात्मक भूमिकेबाबत आणि एमआयएमशी असलेल्या संबंधांबाबत पुढे काय घडतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Ans: युनुस शेख हे ठाणे महानगरपालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील आहेत. ते केबल आणि इंटरनेट व्यवसायाशी संबंधित आहेत.
Ans: युनुस शेख यांनी आपण शिवसेनेत प्रवेश केलेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
Ans: 'एकनाथ शिंदे साहेब हे सर्वांचेच बॉस आहेत, आमचेही बॉस आहेत,' असं युनुस शेख म्हणाले.






