मोठी राजकीय घडामोड! 'कैसे हराया' फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!
युनूस शेख यांचा शिवसेनेच्या कार्यालयातील सत्काराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये त्यांचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार होताना दिसत आहे. त्यानंतर त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
युनूस शेख यांची अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद आहे. या पत्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा उल्लेख असून, शिवसेना संघटना बळकट करण्यासंबंधीही सूचना आहेत.
पक्षप्रवेशाच्या बातम्यांनंतर युनूस शेख यांनी व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले. आपल्या कुटुंबाचा सुमारे ४० वर्षांपासून केबल व्यवसाय असून, इंटरनेट सेवेशीही आपण संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय केबल सेनेतील नियुक्ती ही व्यवसायाशी संबंधित संघटनात्मक जबाबदारी आहे. याचा अर्थ आपण शिवसेना पक्षात प्रवेश केला असा होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कळवा-मुंब्रा परिसरातील केबल ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांना एकत्र आणण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमच्या तिकिटावर सहर शेख विजयी झाल्या होत्या. निवडणुकीनंतर आयोजित सभेत त्यांनी ‘कैसे हराया’ असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला होता. याच भाषणात त्यांनी पुढील पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला होता. मात्र, या वक्तव्याचा संदर्भ एमआयएम पक्षाचा हिरवा रंग आणि पक्षविस्ताराशी संबंधित असल्याचे स्पष्टीकरण सहर शेख यांनी दिले होते.
युनूस शेख हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जात होते. ठाणे महापालिका निवडणुकीत त्यांनी मुलगी सहर शेख यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने सहर शेख यांनी एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. या विजयानंतर युनूस शेख आणि सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली होती. उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमधील राजकीय मतभेद उघड झाले होते.
मुंब्रा-कळवा परिसरात जितेंद्र आव्हाड यांचा राजकीय प्रभाव राहिला आहे. त्याच परिसरात एमआयएमच्या सहर शेख यांनी महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्याने स्थानिक राजकारणात नवीन चर्चा सुरू झाली होती. आता युनूस शेख यांची शिवसेनेशी संबंधित केबल संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे या घडामोडीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, त्यांनी स्वतः पक्षप्रवेशाचा दावा नाकारल्याने ही नियुक्ती आणि अधिकृत राजकीय पक्षप्रवेश यांतील फरक महत्त्वाचा ठरतो. युनूस शेख यांच्या नियुक्तीमुळे मुंब्र्यातील स्थानिक राजकारणात पुढे कोणत्या घडामोडी घडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






