The bride escapes with Rs 1.5 lakh after the defeat, VHP exposes gang, one arrested, other accused absconding
बडनेरा : हार टाकत विवाहानंतर लगेच दीड लाख रुपये घेऊन नववधूने पलायन केले. अकोली येथील खंडेलवाल नगर स्थित एक प्लॅटमध्ये ही घटना सोमवारी (२५ एप्रिल) घडली. मध्य प्रदेशातील रतलाम निवासी नवरदेवाच्या वडीलाने केलेल्या तक्रारीनंतर विहिंपने या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड केला. त्यानंतर, प्लॅट मालक हर्षद दिलीप अलोणे (३३, खंडेलवाल नगर) याला बडनेरा पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलिसांनी आता नववधू संगीता जयदेव परडे, दलाल असलम मिया शेरू व लता छोटू खडसे (यशोदा नगर) यांचा शोध सुरू केला आहे.
दिव्यांग मुलासाठी झाले फसवणुकीचे शिकार
मध्य प्रदेशातील रतलाम निवासी राजेश रमेशचंद्र कथुनिया यांनी सोमवारी दुपारी विहिंप प्रमुख विजय शर्मा, श्रीरंग बडनेरकर व नीता कलंत्री यांनी संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रारदार राजेश केथुनिया यांनी तक्रार दाखल केली. दिव्यांग मुलाकरिता मुलगी मिळत नव्हती. या दरम्यान असलम मिया शेरू मिया याने साई नगरात एक गरीब मुलगी असल्याचे सांगितले. मात्र, गरीब असल्याने त्यांना विवाह करण्याकरिता दीड लाख रुपये द्यावे लागणार असे म्हटले.
दलालासह ३ फरार
मुलीने मुलाला पसंत केले. त्यानंतर सोमवारी खंडेलवाल नगरात हर्षद अलोणे यांच्या प्लॅटवर दोघांनी एकमेकांना हार घालत लग्न केले. १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विवाहनामा देखील लिहून दिला. या दरम्यान नववधू संगीता परडे हिने मिळालेली दीड लाख रुपयांची रक्कम आईच्या खात्यात टाकण्यासाठी बँकेत जात असल्याचे सांगत पोबारा केला. वधू परत न आल्याने दीड लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बडनेरा पोलीस आरोपी हर्षद अलोणे हे चौकशी करीत टोळीला पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रकारे विहिंपचे विजय शर्मा यांनी ठगबाजांच्या टोळीचा भांडाफोड केला.