मुंबई : आज ६ डिसेंबर रोजी गुजरातमधून आणलेलया सिंहाच्या जोडीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सिंह राजांना मुंबईच्या जंगलात आणण्यात येणार असून यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची शान अधिकच वाढणार आहे. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्याना भेट देणाऱ्या पर्यटकांना पुन्हा सिंह सफारीचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून प्रत्येकी २ वर्ष वयाचे सिंह काही दिवसांपूर्वीच मुंबईत आणण्यात आले. मुंबईतील वातावरणाशी परिचित होण्यासाठी काही काळ विलगीकरणात ठेवण्यात आले. आता मुंबईतील वातावरणाची पुरेशी सवय झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात त्यांना सोडण्यात येणार आहे. आशियायी सिंहाच्या या जोडीत एक नर आणि एक मादी असून भारतीय स्टेट बँकेने त्यांना देखभालीसाठी दत्तक घेतले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे १२ हेक्टर कुंपण क्षेत्रामध्ये १९७५-१९७६ मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसुलात मोठी वाढ झाली होती. परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी झाली. गेल्या महिन्यात १७ वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला होता. त्यामुळे आता दोन सिंह आल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची शान आणखी वाढणार आहे.