बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे पहिले गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे मोठ्या उत्साहात (Ashadhi Wari 2022) पार पडले. टाळ मृदंगाचा गगनभेदी निनाद, वैष्णवांमध्ये संचारलेला उत्साह व भाविकांमध्ये रिंगण सोहळ्याची लागलेली उत्कंठा या भक्तीमय वातावरणात या नयनरम्य रिंगण सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
सणसर येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळ्याने बेलवाडीकडे प्रस्थान ठेवले. यानंतर जाचक वस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुशील पवार, उपसरपंच प्रकाश नेवसे, माजी उपसरपंच विक्रम निंबाळकर, पोलिस पाटील रेश्मा नेवसे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर बेलवाडीमध्ये पालखी सोहळा दाखल होताच ग्रामपंचायतीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर पालखी रिंगणस्थळी विसावली. दरवर्षी होणारा हा रिंगण सोहळा दोन वर्षानंतर प्रथमच होत असल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती. याची देही, याची डोळा! याप्रमाणे पालखी सोहळ्यातील हा नयनरम्य गोल रिंगण सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण परिसर वैष्णवांसह भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरून गेला होता.
टाळमृदंगाच्या गजरात ज्ञानबा-तुकारामाचा जयघोष, तुतारीच्या निनादातही ग्यानबा तुकाराम जयघोष अशा वातावरणात या रिंगण सोहळ्याला सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला. सुरुवातीला बेलवाडी येथील अक्षय मचाले व अरुण वाघमोडे यांच्या मेंढ्यांचे गोल रिंगण संपन्न झाले. यानंतर पताकाधारक वारकऱ्यांनी टाळमृदुंगाच्या गजरात आपली प्रदक्षिणा धावत पूर्ण केली. यामध्ये अनेक वृद्ध वारकरी देहभान विसरून धावत होते.
यानंतर तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन महिला वारकऱ्यांनी धावत प्रदक्षिणा पूर्ण केली. विणेकरी यांनी धावत प्रदक्षिणा पूर्ण केली. यानंतर अश्वाच्या गोल रिंगणास प्रारंभ झाला. प्रारंभी बाभूळगावकरांच्या अश्वाने धावण्यास सुरुवात केली. यापाठोपाठ मोहिते पाटलांचा अश्व धावला. दोन्ही अश्वांनी वायू वेगाने प्रदक्षिणा पूर्ण करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या अश्वांनी दौड पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पायाखालील रज आपल्या कपाळी लावण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली. यानंतर वैष्णवांचे या मैदानावर खेळ रंगले.
अनेक भाविकांनी वारकऱ्यांसोबत फुगड्यांचा आनंद लुटला. यामध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील फुगड्यांचा आनंद लुटला. टाळमृदंगाच्या गजरात पद्धतीने वारकऱ्यांनी धरलेला ठेका पाहून भाविकांनीही वारकऱ्यांसोबत हरिनामाचा गजर करत ठेका धरला. यानंतर आरती घेण्यात आली. यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे,प्रसिद्ध उद्योजक अर्जुन देसाई, सरपंच माणिकराव जामदार, उपसरपंच अनिता खैरे, छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, शहाजी शिंदे, माजी सरपंच दादासाहेब गायकवाड, अनिल खैरे, सर्जेराव जामदार आदी उपस्थित होते.
यानंतर बेलवाडी गावातील हनुमान मंदिरात पालखी विसावली.
यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बेलवाडी परिसरातील ग्रामस्थांनी वारकऱ्यांची विविध पद्धतीने सेवा केली. यामध्ये अन्नदान, बिस्किट वाटप, पाणी वाटप आदींसह इतर उपक्रम राबविण्यात आले. दरम्यान, या पालखी सोहळ्यात अडीच लाखाहून अधिक वैष्णव व भाविक सहभागी झाल्याने पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह बाहेरील जिल्ह्यातून पोलीस कुमक बंदोबस्तासाठी मागविण्यात आली असून, यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बेलवाडीतील विसाव्यानंतर पालखी सोहळ्याने अंथूर्णे मुक्कामासाठी प्रस्थान ठेवले.