
फोटो सौजन्य - Social Media
सावन वैश्य | नवी मुंबई : नवी मुंबईच्या मानाच्या माघी गणपती उत्सवामध्ये कोपरखैरने सेक्टर २० येथील केशरी प्रतिष्ठानने यंदा तिसऱ्या वर्षात पदार्पण करत उत्साहात आणि भक्तिभावात माघी गणपती उत्सवाची सुरुवात केली आहे. मागील दोन वर्षांत भाविकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, यंदा हा उत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या स्वरूपात साजरा करण्यात येत आहे.
केशरी प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात आलेली यंदाची गणेशमूर्ती ही या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण दाते यांनी साकारलेली ही देखणी आणि कलात्मक गणेशमूर्ती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मूर्तीतील बारकावे, भावमुद्रा आणि पारंपरिक सौंदर्य यामुळे भक्तांचे मन जिंकले जात असून, अनेक भाविक आवर्जून दर्शनासाठी येत आहेत.
माघी गणपती हा विशेष भक्तिभावाने साजरा केला जाणारा उत्सव असून, त्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता केशरी प्रतिष्ठानने यंदा सजावट, आरास आणि कार्यक्रमांचे नियोजन अत्यंत सुबक पद्धतीने केले आहे. आकर्षक प्रकाशयोजना, भक्तिमय वातावरण आणि शांत, शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
उत्सव काळात केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरतेच आयोजन न ठेवता, समाजोपयोगी उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे. आरती, भजन, प्रवचन यांसह विविध सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवून समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानकडून केला जात आहे. यामध्ये स्वच्छता, पर्यावरण जाणीव, सामाजिक बांधिलकी यासारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
या उत्सवाला स्थानिक नागरिक, गणेशभक्त तसेच तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभत आहे. परिसरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून, नागरिकांकडून केशरी प्रतिष्ठानच्या आयोजनाचे कौतुक केले जात आहे. विशेषतः अल्पावधीतच या मंडळाने नवी मुंबईच्या माघी गणपती उत्सवात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
केशरी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भाविकांचा वाढता प्रतिसाद आणि मिळणारे प्रेम हेच आमचे खरे बळ आहे. पुढील काळात हा उत्सव अधिक व्यापक स्वरूपात, अधिक सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा आमचा मानस आहे. नवी मुंबईच्या माघी गणपती उत्सवात केशरी प्रतिष्ठानचा हा उपक्रम निश्चितच लक्षवेधी ठरत असून, भाविकांसाठी भक्ती आणि संस्कृतीचा संगम ठरत आहे.