संग्रहित फोटो
वाई : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, बावधन येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी युवासेना तालुकाप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणवादी नितीन शांताराम भिलारे यांच्यासह सहकारी शिवसैनिक तालुकाप्रमुख उमेश गंगाराम गुरव व बाबाजी शिवराम उंबरकर (तालुका प्रमुख) यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे.
या पक्षप्रवेशामुळे महाबळेश्वर तालुक्यात भाजपला निश्चितच बळकटी मिळणार असून, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषतः भिलार गटात या पक्षप्रवेशाचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. नितीन भिलारे हे गेली कित्येक वर्षे सामाजिक, पर्यावरण व युवक चळवळीत सक्रिय असून, त्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या संघटनात्मक बांधणीला मोठे पाठबळ मिळणार असल्याचे मानले जात आहे. तसेच २७ वर्षे शिवसेनेत कार्यरत असलेले उमेश गुरव व राजकीय अनुभव असलेले बाबाजी उंबरकर यांच्या सहकार्यामुळे पक्ष बांधणीला मोठा हातभार लागणार आहे.
विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भाजप हा विकासाचा विचार घेऊन काम करणारा पक्ष आहे. महाबळेश्वर तालुक्यातील विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल. नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा व ताकदीचा निश्चितच पक्षाला फायदा होईल, असे गोरेंनी सांगितले. आमच्या प्रवेशामुळे भाजपा महाबळेश्वर तालुक्यात अधिक सक्षम होईल, असा विश्वास नितीन भिलारे, उमेश गुरव व बाबाजी उंबरकर यांनी व्यक्त केला.
हे सुद्धा वाचा : महाबळेश्वर तालुक्यात उमेदवारी अर्जांचा महापूर; अखेरच्या दिवशी तब्बल…
भाजपा अधिक ताकदीने मैदानात उतरणार
या पक्षप्रवेश सोहळ्यास माजी आमदार मदन भोसले, निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, वाई पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, चिन्मय कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अनिल भिलारे, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली भिलारे, माजी सभापती विजयकुमार भिलारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, या पक्षप्रवेशामुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, येणाऱ्या निवडणुकीत भाजपा अधिक ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.






