पंढरपूर : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या मधील सोलापूर जिल्ह्यातील दुसरे गोल रिंगण खुडूस याठिकाणी झाले. मोठ्या भक्तीमय वातावरणात रिंगणाला सुरूवात झाली. प्रारंभी पताकाधारी आणि वीणेकरी गोल रिंगणी धावले. तर त्यानंतर मानाचे अश्वांनी रिंगणाचे 2 फेर्या पुर्ण करत माउलीच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी माऊली.माऊली असा एकच गजर झाला. रिंगणातून वारकऱ्यांना पंढरपूरच्या दिशेने जाण्यासाठीची अधिक ऊर्जा मिळते. आणि याच ऊर्जेचे द्योतक म्हणून रिंगणातील पारंपारिक खेळ फुगडी याला अधिक महत्त्व प्राप्त आहे. रिंगणानंतर हा सोहळा वेळापूर मुक्कामी जाऊन पोहोचला. उद्या गुरुवारी हा सोहळा पंढरपूर तालुक्यात प्रवेश करुन भंडीशेगांव मुक्कामी जाऊन पोहोचणार आहे.
तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे माळीनगर येथे उभे रिंगण पार पाडले. यावेळी रस्त्तांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी ‘तुकाराम माऊली तुकाराम’असा गजर करत मानाचे अश्व उभ्या रस्त्यावर सरळ रेषेत दौडले. यांनातर सर्व वारकारी भक्तांनीही धावा केला. आणि हा सोहळा विठूनामाच्या गजरात बोरगांव मुक्कामी जाऊन पोहोचला. उद्या हा सोहळा पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली या ठिकाणी मुक्कामी असणार आहे.