सासवड : माजी आमदार बच्चू कडू यांना पाहताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडू यांना “तुम्ही पुरंदरच्या विमानतळ प्रकल्प विरोधातील शेतकरी आंदोलनात लक्ष घालू नये, ” असे सूचक वक्तव्य केले. यावर बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर देताना मला शेतकऱ्यांनी बोलावले असल्याने जावे लागणार आहे असे स्पष्ट केले. त्यावर आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला मोबदला देणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र तेथील शेतकरी पूर्णपणे विस्थापित होणार असेल तर असे प्रकल्प नको असे कडू यांनी ठणकावले. तसेच पुरंदर विमानतळावरून खासगी विमाने उडणार आहेत, सरकारची थोडीच विमाने उडणार आहेत. त्यामुळे त्यांना मोबदला द्याच, त्याचबरोबर विमान कंपनीत भागीदारी सुद्धा द्या असेही स्पष्ट शब्दात सांगितले. दरम्यान अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात झालेली खडाजंगी चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर मुंजवडी, खानवडी, पारगाव आदी सात गावांमध्ये विमानतळ प्रकल्प जाहीर करण्यात आला असून विमानतळ प्रकल्पाला स्थानिक गावांतील शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. पुरंदर प्रशासकीय कार्यालयासमोर याविरोधात तीन दिवस उपोषणही करण्यात आले होते. मात्र प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचीही भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यादरम्यान विमानतळ प्रकल्प विरोधाची ताकद निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांना आंदोलनात सहभाग घेण्याबाबत विनंती केल्यानंतर त्यांनीही तत्काळ होकार दिला असून २० तारखेला आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.
‘पुरंदरच्या विमानतळ आंदोलनात लक्ष घालू नका’
दरम्यान माजी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिव्यांगांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्व विभागांचे सचिव आणि प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मिटिंग सुरु होण्यास काही अवधी असताना बच्चू कडू आणि अजित पवार यांचे एकाच वेळी आगमन झाले. त्याच वेळी बच्चू कडू यांना पाहताच अजित पवार यांनी तुम्ही पुरंदरच्या विमानतळ आंदोलनात लक्ष घालू नका, असे सुतोवाच केले. त्यावर दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
दिवसभर ठरला चर्चेचा विषय
बच्चू कडू आणि अजित पवार यांच्यातील खडाजंगी दिवसभर चर्चेचा विषय ठरला असून यावरूनच ” ब्रम्हदेव आले तरी विमानतळ प्रकल्प करणारच ” अशी घोषणा करणाऱ्या अजित पवारांसाठी बच्चू कडू यांचा आंदोलनातील सहभाग हाच मोठा इशारा मानला जात आहे. त्यामुळे बच्चू कडू आंदोलनासाठी उपस्थित राहणार कि राज्य सरकार त्यांची मनधरणी करणार ? शेतकऱ्यांना दिलेला शब्द बच्चू कडू पाळणार कि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सकारात्मक प्रतिसाद देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.