Tirupati Laddu Controversy: तिरूपतीच्या प्रसादात चरबी आढळल्याचे प्रकरण; देवस्थानचे सदस्य मिलिंद नार्वेकर म्हणाले...
मुंबई: भारतातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले तिरुपती मंदिराच्या प्रसादामध्ये फिश ऑईल असल्याचे सिद्ध झाले आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती मंदिरातील प्रसादामध्ये तूपाऐवजी प्राण्यांचा चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर प्रसादाचा नमुना हा तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आता त्या तपासणीचे रिपोर्ट समोर आले आहेत. त्यामध्ये प्रसादात फिश ऑईल वापरले जात असल्याचे समोर आले आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि तिरुमला देवस्थानचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तिरुमाला देवस्थानच्या प्रसादामध्ये ऑइल असल्याचे समोर आल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावर तिरमल देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी भाष्य केले आहे. एका वाक्यात आपली प्रतिक्रिया देताना नार्वेकर यांनी मला या प्रकरणाबाबत काही माहिती नसल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानचे सदस्य म्हणून शपथ घेतली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संताप व्यक्त
तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या तेलाचा वापर केल्याचे उघडकीस आल्यापासून राजकारण चांगलेच तापले आहे. आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यने तिरुपती मंदिरातील लाडूंसंदर्भात मोठे विधान करत अक्षरश: संताप व्यक्त केला आहे. तिरुपती तिरुमला मंदिरातून 1 लाख लाडू अयोध्येला पाठवण्यात आल्याचा दावा मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात करण्यात आला आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाच्या दिवशी तिरुपती मंदिरातून १ लाख लाडू पाठवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. अयोध्येतील भाविकांमध्ये हे लाडू वाटण्यात आले. तिरुपती मंदिराच्या प्रसादात गोमांस, डुकराची चरबी आणि माशाचे तेल मिसळल्याचेही तपासात समोर आले आहे. हे सर्व आंध्र प्रदेशातील तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारच्या कार्यकाळात घडले.
टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी दावा केला आहे की, प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) ने पुरवलेल्या तुपाचे नमुने गुजरात स्थित पशुधन प्रयोगशाळेने भेसळ असल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी प्रयोगशाळेत कलेल्या तपासणीचा अहवालही दाखवला आहे. या अहवालानुसार, तपासणीसाठी देण्यात आलेल्या तुपाच्या नमुन्यात “प्राण्यांची चरबी”, “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि फिश ऑइलच असल्याचा दावा करण्यात आला होता. सॅम्पलिंगची तारीख 9 जुलै 2024 होती आणि प्रयोगशाळेचा अहवाल 16 जुलैचा होता.