सातारा : महाराष्ट्राची कुस्ती परंपरा ही प्रगल्भ आणि बहुआयामी असून, या परंपरेने जागतिक पातळीवर आपला झेंडा फडकवला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा ते कोल्हापूर हा पट्टा कुस्ती पंढरी ओळखला जातो. या पंढरीतील नामवंत मल्लांना आंतरराष्ट्रीय सुविधा देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मुबलक निधी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आश्वासन खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिले. कुस्तीची परंपरा जपण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
उदयनराजे भोसले मित्र समूह व श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना रॉयल एनफिल्ड बुलेट व उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांना होंडा युनिकॉर्न तसेच पैलवान गणेश कुंकूल, आकाश माने, सुमित गुजर यांना प्रत्येकी 51 हजार रुपये बक्षीस अशा बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन जलमंदिर येथे करण्यात आले होते. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी नामवंत पैलवानांचा सत्कार करून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. व्यासपीठावर तालीमसंघाचे अमर जाधव, उद्योजक संग्राम बर्गे, जिल्हा परिषद सदस्य सुनील काटकर, पैलवान सचिन शेलार, नयन पाटील, सागर भोसले इत्यादी यावेळी उपस्थित होते.
उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, आपण माझा भाषणामध्ये उल्लेख दैवत असा केला. मात्र, मी तुमचा सहकारी आहे, मित्र आहे. कुस्तीच्या पारंपारिक खेळामध्ये येणाऱ्या अडचणी मला समजत आहेत. त्याकरिता जास्तीत जास्त सुविधा मला कशा उपलब्ध करून देता येईल याकरिता मी बांधील आहे. राजकारणात सर्व गोष्टी करता येतात. मात्र, राजकारण हे राजकारणाच्या जागीच असावं ते खेळामध्ये येऊ नये. राजकारण हे गजकरण झालेले आहे. त्यामुळे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी जनतेचाच आहे.