पंढरीनगरीत वाहतूकीची कोंडी रोजचीच
पंढरपूर : महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या विठुरायाचे दर्शन करण्यासाठी भाविक येतात. परंतु, त्यांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पण पंढरपूर शहरातील वाहतूक कोंडी आता पंढरपूरसह प्रवाशांना रोजचीच झाली आहे. तर शहरातील प्रमुख मार्गावर असणारी अतिक्रमणे हटवण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई योजना राबवण्याची गरज आहे.
पंढरपूर शहरातून पंढरपूर-सांगली व पंढरपूर-कराड आणि पंढरपूर-पुणे तसेच पंढरपूर-नगर व पंढरपूर-विजापूर असे पाच राज्यमार्ग जातात. या राज्य मार्गावर पंढरपूर बसस्थानक, कराड नाका, सरगंम चौक, कॉलेज चौक, लहुजी वस्ताद चौक, अर्बन बँक चौक, तीन रस्ता चौक असे प्रमुख चौक येतात. या चौकांमध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांची वाहतूक कोंडी ठरलेली असते. अनेकवेळा जड वाहनाच्या वर्दळीने वाहतूक कोंडी होऊन वाहतूक अधिक काळ थांबते. मात्र, अशावेळी वाहतूक पोलिसांच्या कमी संख्येमुळे शहरातील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना व भाविकांना सहन करावा लागतो.
प्रमुख चौकांत स्टॉल्स, वडापावची वाहने
शहरातील प्रमुख चौकांत फळ विक्रेते आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून स्टॉल्स लावले आहेत. दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था सुरळीत नसल्याने याचा परिणाम रस्त्यावर वाहनांसाठी दहा फुटांहून कमी जागा वाहने जाण्यासाठी राहते. शहरातील सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वडाप चालकांनी वाहने आडवी लावलेली असतात. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असते.
बाजारादिवशी समस्या गंभीर
पंढरपूर शहरातील आठवडा बाजार मंगळवारी भरतो. यादिवशी शहरातील वाहतूक कोंडीमुळे वाहतूक दर दोन तासाला ठरलेली असते. तर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. याबाबत मुख्याधिकारी प्रशांत जाधव व डीवायएसपी अर्जुन भोसले यांनी पुढाकार घेवून अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्याची गरज आहे.
रिंगरोडचा प्रश्न लांबणीवर
शहराबाहेरील रिंगरोडचा प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने शहरातील वाहतूक कोंडीस अडथळा निर्माण होत आहे. आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाच्या महापूजेप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी रिंगरोडचे काम सुरू करण्यात आले होते. मुरुमीकरण करुन रस्ता सुरूही करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. याबाबत आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी लक्ष घालून हा रिंगरोड सुरू करण्याची गरज आहे.