महाराष्ट्राचे अत्यंत कडक, कर्तव्यकठोर आणि धडाडीचे IAS अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे म्हणजेच FDA चे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून या विभागाने एक नवीन आणि आक्रमक रूप धारण केले आहे. सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ करणाऱ्यांवर आणि नियम पाळत नसलेल्या आस्थापनांवर त्यांनी सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. नजीकच्याच काळात त्यांच्या मोठमोठ्या प्रस्थापित फूड कंपन्यांवर आणि प्रस्थापित हॉटेल्सवर झालेल्या धडक कारवाया आपल्याला माहीतच असतील.
अन्न व औषध प्रशासन म्हणजेच Food & Drug Administration (FDA) अंतर्गत नेमके कोणते विभाग येतात आणि आयुक्त म्हणून त्यांची प्रमुख कार्ये आणि जबाबदाऱ्या काय आहेत, हे आज इथे पाहूयात,
१. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) मुख्य विभाग
FDA, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या शाखा किंवा विभागांमध्ये कार्य करते,
अन्न सुरक्षा विभाग
हा विभाग राज्यातील नागरिकांना मिळणाऱ्या अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काम करतो. यामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, अन्न उत्पादक कंपन्या, दुकाने, मॉल तसेच क्विक-कॉमर्स कंपन्यांची (उदा. ब्लिंकिट, झेप्टो, इ.) तपासणी केली जाते.
औषध नियंत्रण विभाग
राज्यात विकली जाणारी औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणे यांची गुणवत्ता तपासणे, बनावट औषधांची विक्री रोखणे, औषध दुकानांचे लायसेन्स व नियमांचे पालन, आणि रक्तपेढ्यांची तपासणी या विभागाद्वारे केली जाते.
२. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अंतर्गत येणारी प्रमुख कार्ये आणि जबाबदाऱ्या
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीए प्रशासनाने सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडित खालील या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे:
अन्नातील भेसळ रोखणे आणि अचानक तपासणी
दूध, पनीर, खवा यांसारख्या रोजच्या वापरातील पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राज्यभरात अचानक धाड मारणे आणि मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवणे हे या विभागाचे मुख्य काम आहे.
स्वच्छता आणि सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी
हॉटेल्स, कॅन्टीन आणि फूड आउटलेट्समध्ये अस्वच्छता आढळल्यास किंवा अन्न साठवणुकीचे नियम पाळले जात नसल्यास त्यांचे परवाने तत्काळ निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई या विभागामार्फत केली जाते.
सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी आणि त्यानिगडीत नियमन
तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, उघड्यावर किंवा सुट्या स्वरूपात खाद्यतेल विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे आणि दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या विभागाकडे आहेत.
बनावट आणि निकृष्ट औषधांवर नियंत्रण
राज्यात कुठल्याही भागात बनावट किंवा एक्सपायरी डेटची औषधे विकली जाऊ नयेत, यासाठी रिटेल व किरकोळ औषध विक्रेत्यांवर सतत नजर ठेवणे आणि लायसेन्स तपासणे हे औषध विभागाचे कार्य आहे.
पारदर्शक आणि डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा सुरळीत राबवणे
सामान्यांना एफडीएशी थेट जोडण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी complaints.mahafda.in हे ऑनलाइन पोर्टल अधिक प्रभावी केले आहे. याद्वारे नागरिक घरबसल्या भेसळयुक्त अन्न, निकृष्ट औषध किंवा अस्वच्छतेबद्दल थेट तक्रार नोंदवू शकतात.
थोडक्यात निष्कर्ष काय तर..
तुकाराम मुंढे यांनी FDA मध्ये हाती वज्र घेतल्यापासून प्रशासकीय यंत्रणेला चांगलीच शिस्त लागली आहे. “प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे” या मुद्यावर भर देत, नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे हेच या विभागाचे मुख्य धोरण बनले आहे.






