एसटी प्रवाशांचे दोन मोबाईल फोन चोरीला; चोरट्याच्या शोधासाठी बस चक्क पोलीस ठाण्यात
मंगळवेढा : मंगळवेढा बस स्थानकामध्ये एसटी बसमध्ये चढत असताना दोन प्रवाशांचे मोबाईल चोरट्याने हातोहात चोरुन नेले. हा प्रकार घडल्याने प्रवाशांच्या आग्रहास्तव एसटी चालकाला चोरट्याचा शोध घेण्यासाठी चक्क मंगळवेढा पोलीस ठाण्यात बस आणण्याची वेळ आली.
मंगळवेढा बसस्थानकावरुन सायंकाळी साडेपाच वाजता सुटणारी बस (एमएच 14 बीटी 2151) या बसमध्ये इंग्लिश स्कूल प्रशालेतील फार्मसीची विद्यार्थिनी दीक्षा पवार ही शाळा सुटल्यानंतर मंगळवेढा-मानेवाडी या बसने आपल्या मूळ गावी भोसे येथे निघाली होती. बसमध्ये चढत असताना बॅगेत ठेवलेला 22 हजार रुपये किंमतीचा विव्हो कंपनीचा मोबाईल चोरट्याने हातोहात लंपास केला. तर याचवेळी विष्णू गवळी हे मंगळवेढ्यातील रहिवाशी पुणे गाडीत चढत असताना त्यांच्या खिशातील 10 हजार रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरट्याने गायब केला.
दरम्यान, हे दोन्ही मोबाईल गायब झाल्यानंतर प्रवाशी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. चालकाने तात्काळ बस पोलीस स्टेशन आवारात आणून घडला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी संपूर्ण गाडीमध्ये मोबाईलची तपासणी प्रवाशांकडे केली. मात्र, तो मिळून आला नाही.
यापूर्वीही अनेकदा घडल्या मोबाईलचोरीच्या घटना
यापूर्वीही अनेकवेळा बसस्थानकामधून प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेची पोलिसात नोंद होते. मात्र, याचा तपास पोलिसांना करण्यात यश येत नसल्यामुळे चोरट्यांचे फावत आहे. पोलिस कसून तपास करण्यात तसदी घेत नसल्याचा आरोप प्रवाशांचा आहे. बसस्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, बसमध्ये चढताना कॅमेरात ते कैद होत नसल्यामुळे चोरटे सहीसलामत चोरी करुन निघून जात आहेत.