“Unless the soil of Maharashtra teaches the traitors a lesson....”; Jitendra Awhad's reaction after Balamama's victory from Bhiwandi
कल्याण : भिवंडी लोकसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा विजय झाला. बाळ्या मामांचा विजय हा जनतेचा विजय असून, ही निवडणूक जनतेने हातात घेतला होती. संविधानाचा हा विजय असून या देशात जो कोणी स्वतःला देव मानेल, स्वतःचा मीपणा दाखवेल, त्याला ही जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया आंबेडकरवादी कार्यकर्ते अजय सावंत यांनी दिली. बाळ्या मामा यांच्या विजयानंतर कल्याणमधील माता रमाबाई आंबेडकरनगर येथील रहिवाशांनी पेढे वाटत जल्लोष साजरा केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी चांगलाच जल्लोष केला, सुरेश म्हात्रेंचे अभिनंदन करताना जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. ते म्हणाले की, हा जनतेचा विजय आहे. महाराष्ट्रातील मातीला गद्दारी आवडत नाही. शिवाजी महाराजांबरोबर गद्दारी करणाऱ्यांना अजून महाराष्ट्र विसरला नाही. त्यामुळे या मातीचाच गुणधर्म आहे, गद्दारी करणाऱ्यांना ही माती सोडत नाही. एकूणच महाराष्ट्राच्या जनतेला या राजकारणाचाच कंटाळा आला आहे. आमचासुद्धा कंटाळा आलाय, त्यामुळे महाराष्ट्रात असे धक्कादायक निकाल समोर येत आहेत.
महाविकास आघाडीला महाराष्ट्रात यावेळी भरभरून यश मिळाले आहे. त्यातल्या त्यात शरद पवार गटाचे 10 पैकी 7 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे शरद पवार गटासाठी ही मोठी गोष्ट आहे. शरद पवारांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याने महाराष्ट्रात हाच पक्ष सर्वाधिक स्ट्राईक रेटने पुढे आहे.
मुंबईतसुद्धा ठाकरे गटाला मोठे यश मिळाले आहे. मुंबईच्या उत्तर-मध्य मतदारसंघात मोठे यश आघाडीला मिळाले आहे. आज सकाळी उत्तर-मध्य मुंबईत मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा काही काळासाठी वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर भाजपच्या उज्ज्वल निकम यांनी आपले मताधिक्य वाढवत नेले. मध्यंतरीच्या काळात उज्ज्वल निकम यांचे मताधिक्य 56 हजारापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे वर्षा गायकवाड यांचा पराभव होणार, अशी चर्चा होऊ लागली होती. मात्र, मतमोजणीच्या शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये हे चित्र पूर्णपणे पालटले.
पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी आघाडी 56 हजारावरुन प्रथम दीड हजारापर्यंत आणि नंतर 700 मतांपर्यंत खाली आणली. शेवटच्या फेरीत उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात अवघ्या 176 मतांचा फरक होता. त्यामुळे कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर वर्षा गायकवाड यांनी निसटती आघाडी घेत उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. वर्षा गायकवाड यांच्या विजयामुळे मुंबईत महाविकास आघाडीच्या विजयी खासदारांची संख्या पाचवर पोहोचली आहे.