5 जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेणार, हवामान बदलणार; हवामान विभागाचा अंदाज
पाटस : दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेच्या कडकटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील केडगाव, पाटस, वरवंड, कुरकुंभ यासह काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. परिणामी, काढण्यात आलेला कांदा, गहू व इतर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा वीटभट्टी व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे.
मागील तीन महिन्यांपासून उष्णतेच्या तीव्रतेने आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तीव्र उन्हात दुपारनंतर अचानक आकाशात काळे ढग आल्याने ढगाळ वातावरण निर्माण झाले. विजेच्या कडकटासह अवकाळी पावसाने सुरुवात केली. तालुक्यातील पाटस, केडगाव, वरवंड, कुरकुंभ, दौंड यासह अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला.
दरम्यान, पाटसमध्ये सोमवारी सायंकाळी सहाच्या पुढे अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. परिणामी, पाटसच्या आठवडे बाजारात आलेल्या नागरिकांची धांदल उडाली. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतात काढणीस आलेला कांदा, गहू आणि इतर शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच चौफुला, केडगाव, पाटस या भागातील वीटभट्टी व्यावसायिकांचे या पावसाने मोठे नुकसान केले आहे.
विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाचे थैमान
विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना, अवकाळीमुळे बळी गेल्याचीही घटना सोमवारी घडली. सोमवारी लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या घटना घडली. या दोन्ही घटनांमध्ये नऊ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे.