पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण राज्याभरामध्ये चर्चिले जात आहे. या प्रकरणामध्ये सुरुवातीला अल्पवयीन आरोपीला राजकीय दबावामुळे लवकर जामीन दिल्याचा आरोप केला जात आहे. विशाल अग्रवाल या बड्या बिल्डरचा मुलगा असल्यामुळे सामान्य लोकांना न्याय मिळाणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. या केसमधील अल्पवयीन मुलाच्या सुटकेसाठी राजकीय व्यक्तींनी पुढाकार घेतल्याचे बोलले जात होते. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव समोर आले होते. आता हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रविष्ठ असताना सुनील टिंगरे हे त्यांच्यावर केलेले आरोप पुसण्यासाठी प्रयत्न करत आहे. या केससंदर्भात त्यांनी थेट पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
सुनील टिंगरे यांची पत्राद्वारे मागणी काय?
अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्या विनीता देशमुख यांनी केला. या आरोपानंतर सुनील टिंगरे यांच्या नावाची चर्चा केली गेली. या प्रकरणामध्ये आपला काहीही संबंध नाही असे देखील टिंगरे यांनी सांगितले. यानंतर आता पुण्यातील पब संदर्भात त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना थेट पत्र लिहिले आहे. टिंगरे यांनी पत्रामध्ये वडगाव शेरी व कल्याणीनगर परिसरामध्ये अनाधिकृत पब व हॉटेल रात्री उशीरापर्यंत सुरु असतात असे आमदार सुनील टिंगरे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. या उशीरापर्यंत चालू असलेल्या पबमुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतो. अशा पब व हॉटेलवर त्वरित कारवाई करावी. अन्यथा याविरोधात अधिवेशनात आवाज उठवला जाईल, असे सुनील टिंगरे यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिले आहे. त्यामुळे आपल्यावरील आरोप पुसण्यासाठी सुनील टिंगरे कामाला लागले आहेत.
विनीत देशमुख यांचे आरोप काय ?
सुनील टिंगरे येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी पोलीस अधिकारी, कॉन्स्टेबलवर दबाव आणला. आरोपी वेदांत अग्रवालमुळे दोन लोकांचा जीव गेला. त्याला शांतपणे, आराम करता यावा, यासाठी पिझ्झा, बर्गर खायला दिला. एफआयआर करताना ड्रिंक अँड ड्राइव्हची कलम काढून टाकली. एफआयआर वीक केला” असा आरोप विनीता देशमुख यांनी केला.