वसई : राज्यभरात सध्या पावसाची दमदार बॅटींग सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंच आहे . मात्र याच बरोबर आता नागरिकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी जाणवायला सुरुवात झाली आहे. वाढत्या रोगराईमुळे आजारांचं प्नमाण देखील वाढलं आहे. याचपार्श्वभूमीवर आता उत्तर वसईतील नाळे गावात यलो जॅकेट माशांनी हल्ला केल्यामुळे ग्रामस्थ भयभित झाले असून,त्यावर उपाय करता येत नसल्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. नाळे गावातील लाखोडीत राहणारे विनायक पाटील यांच्या घराजवळील भेंडीच्या झाडाच्या खोडात काही माशांचा थवा आढळून आला होता.
या साध्या माश्या किंवा मधमाशा असाव्यात असा समज झाल्यामुळे या कुटुंबाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र या झाडाजवळून जाणाऱ्या ग्रामस्थांना या माशांनी डंख मारायला सुरुवात केल्यामुळे भयभित होवून पाटील यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे मदत मागितली.त्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट दिल्यावर ते चाट पडले.अशा माशांवर फवारणी करण्यासाठी आमच्याकडे औषध उपलब्ध नसल्याचे सांगत ते निघून गेले.पालिकेच्या अग्नीशमन दलानेही त्यावर उपाय नसल्याचे सांगितले.त्यामुळे ग्रामस्थांनी विरार येथील सह्याद्री हनीचे संचालक संजीव नाईक यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी निदान करत ही माशी हाॕर्नेट प्रजातीची असून तीची यलो जॅकेट अशी ओळख आहे असे सांगितले.
या माशा आक्रमक आणि मांसाहारी असल्याचे नाईक यांनी स्पष्ट करत ग्रामस्थांना तिच्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. संरक्षित कपड्यांचा वापर करुन तसंच द्रव्ययुक्त नायट्रोजन आणि पेट्रोलचा मारा करुन या माशांचा उपद्रव थांबविता येईल असे संजीव नाईक यांनी सांगितले.मात्र,ते वसईबाहेर असल्यामुळे ते परतल्यानंतरच या माशांचा उपद्रव थांबवता येणार आहे.पालिकेचे आरोग्य विभाग या माशांबद्दल अनभिज्ञ असताना,मांडवी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनीही या माशांना प्रतिबंध करण्यासाठी आंम्हाला प्रशीक्षण देण्यात आले नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली आहे.