Vasai Virar Water Cut : वसई-विरारकरांवर पाणीकपातीचे सावट! पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेचे कठोर निर्बंध

Vasai Virar Water Cut : यंदा पावसाने दडी मारल्याने वसई-विरार शहरात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून, महापालिका प्रशासनाने लवकरच टप्प्याटप्प्याने १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे संकेत दिले आहेत.
Photo - Social Media
Vasai Virar Water Cut Vasai Virar Water Cut
Published on: 
Updated on: 

Vasai Virar Water Cut : यंदा पावसाने दडी मारल्याने वसई-विरार शहरात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, महापालिका लवकरच टप्प्याटप्प्याने १० टक्के पाणीकपात लागू करणार आहे. त्यापूर्वीच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी कठोर निबंध व दंडात्मक कारवाईचे आदेश जारी केले आहेत.

वसई-विरार शहराची दैनंदिन पाण्याची गरज ४६९.६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र, सूर्या योजनेतील पेल्हार, धामणी आणि उसगाव धरणांतून २३० दशलक्ष लिटर व एमएमआरडीएच्या सूर्या प्रकल्पातून १७० दशलक्ष लिटर असा एकूण ४०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्ष वितरण ३८० ते ३९५ दशलक्ष लिटर असल्याने शहरात आधीच सुमारे ६९.६३ दशलक्ष लिटरची तूट आहे.

पाण्याच्या मागणीत बरीच वाढ

शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात पोहोचल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. १० टक्के पाणीकपात लागू झाल्यास ही तूट सुमारे ११० दशलक्ष लिटरवर जाण्याची भीती आहे. धरणांमध्ये जुलैपर्यंत पुरेल इतका साठा असला, तरी संभाव्य टंचाई लक्षात घेऊन विभागनिहाय पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. नव्या निर्बंधांनुसार, नागरिकांनी पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होऊ नयेत म्हणून ऑटोमॅटिक फ्लोट वॉल्व्हचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

'या'साठी १० हजार रुपयाची दंडात्मक कारवाई

घरगुती टाकी ओव्हरफ्लो झाल्यास १ हजार रुपये, तर इमारतींच्या भूमिगत टाक्या ओव्हरफ्लो झाल्यास २ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. अनधिकृत किंवा मंजूर व्यासापेक्षा अधिक व्यासाची नळजोडणी आढळल्यास ती तत्काळ खंडित करून ५ हजार रुपये दंड व फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकांच्या पाण्याच्या वापरावरही निर्बंध लागू करण्यात आले असून, टँकरमधून गळती आढळल्यास मालकावर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

सार्वजनिक धुलाई केंद्रे, तलाव राहणार बंद

महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक धुलाई केंद्रे व तरणतलाव पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ खासगी बोअरवेल किंवा विहिरींचे पाणी वापरणारी खासगी धुलाई केंद्रे रविवार, मंगळवार आणि गुरुवार या तीनच दिवशी सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. सलग तीनवेळा नियमांचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.