दारू दुकान, बिअर बारविरोधात ग्रामस्थ आक्रमक! बनावट सह्या, नोटीस न बजावता ठराव केल्याचा आरोप
यवतमाळमधील राळेगाव तालुक्यातील वालधूर येथे प्रस्तावित देशी दारूविक्री दुकान आणि बिअर बारला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांच्या कथित खोट्या सह्यांचा आधार घेत दारू दुकानासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यात आल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले आहे. हा ठराव रद्द करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास १४ ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वालधूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत देशी दारूविक्री दुकान व बिअर बार सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.(फोटो सौजन्य – istock)
पाटणबोरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला! नालेसफाई अभावी ठिकठिकाणी साचले पाणी; स्वच्छतेचा अभाव
मात्र, हा ठराव करताना ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात आल्याचे संबंधीत गावकऱ्यांनी सांगितले. दारू दुकानासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबाबतचा विषय ग्रामसभेच्या पूर्वसूचनेतच नव्हता. हा विषय ग्रामसभेत नेमका कसा आला, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. २६ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेतील ठरावाचा आधार घेत दारू दुकानासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. या ठरावामध्ये गावकऱ्यांच्या खोट्या सह्या करण्यात आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. तसेच ग्रामसभेची नोटीस सार्वजनिक न करणे, ग्रामस्थांना उपस्थित राहण्यासाठी दवंडी न देणे आणि आवश्यक ती प्रक्रिया न पाळणे, असे गंभीर आरोपही करण्यात आले. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडेही धाव घेतली. कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार ३ ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत ठरावातील अनियमितता लक्षात घेऊन संबंधित दारूविक्री दुकान व बिअर बार सुरू करण्यासाठी नव्याने ना-हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असा ठराव करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
प्रस्तावित दारू दुकान हे वालधूर बसथांब्यापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर आहे. या बसथांब्यावरून पाचव्या वर्गापासून पुढील शिक्षणासाठी राळेगाव येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. त्यात १७ वर्षांखालील मुलींची संख्या लक्षणीय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दारू दुकान आणि बिअर बारला देण्यात आलेले ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करावे, कथित अनियमित ठरावाची चौकशी करावी आणि संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, या मागण्यांसाठी ग्रामस्थ आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आंदोलनाच्या तयारीत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामसभेच्या प्रक्रियेची चौकशी करावी, अन्यथा १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
Ans: ग्रामस्थांनी दारू दुकान आणि बिअर बारला विरोध करत बनावट सह्या आणि नोटीस न बजावता ठराव केल्याचा आरोप केला आहे.
Ans: ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ठरावासाठी वापरण्यात आलेल्या काही सह्या बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Ans:






