
Visapurkars oppose Bhivkund coal underground coal mine, farmers' discussions with company management in vain
बल्लारपूर (वा.) : तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत हद्दीतील भिवकुंड भूमिगत कोळसा खाणीकरीता केंद्र सरकारने कोळसा काढण्यासाठी परवानगी दिली. हा कोलब्लाक सनफ्लॅग आयर्न व स्टील को. लि. कपंनीला दिला. या परिसरातील ८०२ हेक्टर जमीन क्षेत्रात भूमिगत कोळसा खाण येणार आहे. यासाठी विसापूर ग्रामपंचायतीने आज शनिवारी पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयात विशेष सभा आयोजित केली. मात्र, कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी व शेतकऱ्यांमधील चर्चा या सभेत निष्फळ ठरली आहे.
विसापूरकरांचा भिवकुंड भूमिगत कोळसा खाणीला विरोध असल्याचे या सभेमध्ये दिसून आले. सनफ्लॅग आयर्न व स्टील को. लि. अधिकाऱ्यांनी विसापूर ग्रामपंचायतीला पत्राद्वारे २३ एप्रिल रोजी सभा आयोजित करण्यासंदर्भात कळविले होते. त्यानुसार ग्रामपंचायतीने कंपनी व्यवस्थापनातील अधिकारी गणेश मानेकर, हेमंत हिंगे, क्रिष्णा शेपुरी, व जयदीप सिन्हा यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले. विसापूर गावाच्या हद्दीतील भिवकुंड कोलब्लॉक भूमिगत कोळसा खाणीसाठी सर्वेक्षण आणि ग्रॉऊंटिंग ऑफ पिल्लर्स करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. मात्र, शेत जमिनीच्या विषयावरून शेतकऱ्यांनी भूमिगत कोळसा खाणीला विरोध केला.
सभा एका तासातच गुंडाळली
सनफ्लॅग स्टील कंपनी ही खासगी आहे. खासगी कंपनीला आमचा विरोध असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. भिवकुंड कोलब्लॉक भूमिगत कोळसा खाण होऊच नये, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. परिणामी सभा एका तासात गुंडाळावी लागली. यावेळी विसापूर येथील सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, माजी सरपंच रामभाऊ टोंगे, बंडू गिरडकर, माजी सभापती गोविंदा पोडे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गेडाम, दिलदार जयकर, सुरज टोमटे, गजानन पाटणकर, सुवर्णा कुसराम यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
हेमंत हिंगे, भुवैज्ञानिक सर्व्हअर, सनफ्लॅग स्टील कंपनी, नागपूर.
केंद्र सरकारने विसापूर गावाच्या हद्दीतील भिवकुंड कोलब्लॉक आमच्या कंपनीला दिला आहे. प्राथमिक पातळीवर कामाला सुरुवात करावयाची आहे. भुगर्भातील ८०२ हेक्टर क्षेत्र भूमिगत कोळसा खाणीसाठी निर्धारित करण्यात येणार आहे. म्हणून शेतकऱ्यासमोर हा प्रस्ताव ठेवला. कंपनीला केंद्र सरकारने भूमिगत कोळसा खाणीसाठी जेवढे क्षेत्र दिले, त्याच प्रमाणे कोळसा खाणीच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. यासाठी काही शेतजमीन शेतकऱ्यांकडून आम्ही विकत घेऊ. विकासाच्या दृष्टीने व रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रकल्प महत्वाचा आहे.