कल्याण : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत ऐन निवडणूकीच्या दिवशी कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील सुमारे ८० हजार पारंपारिक मतदारांची नावे गायब झाल्याची बाब निदर्शनास आली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालंडे यांच्या आयोजनाने कल्याण पूर्वेत मतदार नाव नोंदणी अभियान राबविले जात आहे, या अभियानाचा प्रारंभ बुधवारी ३ जुलै रोजी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या कोळसेवाडी येथील मध्यवर्ती शाखेतून करण्यात आला.
यावेळी हर्षवर्धन पालांडे यांच्यासह माजी महापौर रमेश जाधव, शहर प्रमुख शरद पाटील, नारायण पाटील, हेमंत चौधरी, शांताराम डिघे, चंद्र प्रसाद, सुर्यकांत मोरे, जगदीश तरे, तुळशीराम म्हात्रे, मिना माळवे, साधना पार्टे, संगिता गांधी, दिपाली जाधव, अक्षदा कदम, संध्या केळमकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीत ज्या मतदारांची मतदान यादीतून नावे अचानकपणे गायब झाली आहेत, अशा मतदारांना आपले नांव मतदार यादीत समाविष्ठ करून घेण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली असून या बरोबरच नाव पत्ता, वय यातील बदलही या अभियानात करता येतील अशी माहिती या वेळी हर्षवर्धन पालंडे यांनी दिली.
माजी महापौर रमेश जाधव यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळेच मतदारांची नावे यादीतून गायब झाली आहेत. ती पुन्हा नोंदवून घेण्याचा आमच्या पक्षाचा प्रयत्न असेल. हे अभियान संपूर्ण कल्याण पूर्व विधानसभा मतदार क्षेत्रातील पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या शाखा कार्यालयात राबविले जाणार असल्याने या अभियानाचा जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन शहर प्रमुख शरद पाटील यांनी केले आहे.