ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्व वाहिनी क्र. १. २ व ३ वर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीने देखभाल करण्यासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा यांच्यासह वागळे आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींचा काही भाग येथे शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
बारवी गुरुत्व वाहिनी क्र. १. २ व ३ वर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीने देखभाल करण्याकरीता गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे, ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, तसेच, वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २. नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील.पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. या कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. तसेच, पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने नागरीकांना केले आहे.