बुलढाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. “रविकांत तुपकर गेल्या चार वर्षात एकाही ऊस परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. संघटनेच्या कार्यकारिणीच्या एकाही बैठकीला ते हजर राहिले नाहीत. संघटनेच्या एकाही आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत. गेली चार वर्ष आम्ही त्यांची वाट पाहिली. पण तरीही ते आले नाहीत. पण आता रविकांत तुपकर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी काहीही संबंध नाही.’’ असे कारण देत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी तुपकरांची हकालपट्टी केली.
या कारवाईवर “माझा काय गुन्हा होता की मला एवढी मोठी शिक्षा दिली, अशा शब्दांत तुपकरांनी प्रतिक्रीया दिली आहे. तसेच फेसबुकवर एक सूचक पोस्ट करत त्यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रीया दिली आहे. “संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो, पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो…. माहिती आहे मला पुढची तुमची खेळी, मी तुम्हाला आतून बाहेरून ओळखतो…”, अशा आशयाची सूचक पोस्ट रविकांत तुपकरांनी फेसबुकवर केली आहे.
तसेच, एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हकालपट्टीच्या कारवाईवर प्रतिक्रीया दिली आहे. “मला अजून त्यांचं कोणतेही अधिकृत पत्र आलेले नाही. मात्र, दु:ख या गोष्टीचं आहे की, घरादारांवर तुळशीपत्र ठेवून हातावर शिर घेऊन आम्ही लढत होतो. लाठ्याकाठ्या खाल्या, तुरुंगात गेलो. माझ्या आईवडिलांना, लेकरांना स्वत:पासून दूर ठेवले. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संघटनेच नाव पोहचवण्यासाठी आम्ही लढत राहिलो. वर्षवर्षभर घरादारापासून दूर राहिलो ते संघटनेच काम करण्यासाठी. पण राजू शेट्टींनी त्याचं असे फळ देतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. माझा काय गुन्हा होता की त्यांन मला एवढी मोठी शिक्षा दिली.