मुंबई: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी ट्विटरवर पोस्ट करत कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यांनी आरोग्य कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे नमूद केले. मात्र, या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.
८४ दिवसांचा विलंब का?
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो अत्यंत धक्कादायक आहेत. या घटनेला ८४ दिवस लोटले असून चार्जशीट देखील समोर आली आहे. सरकारने हे फोटो पाहिले नसतील का? मग या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला तब्बल ८४ दिवस का लागले?, आरोपी कृष्णा आंधळे फरार होतोच कसा? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
व्हिडिओ कॉलनंतर थेट धनंजय मुंडेंना फोन?
त्याचवेळी, हत्येदरम्यान विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी वाल्मिक कराडला कॉल केला होता. व्हिडिओ कॉल संपताच वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंना फोन केला. म्हणजेच, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात थेट संपर्क होता, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
“धनंजय मुंडे आणि नैतिकता यांची कधी भेट झाली नाही”
सरकारच्या भूमिकेवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुम्ही म्हणता की राजीनामा नैतिकता म्हणून दिला. पण राजीनामा देणारे व्यक्ती मात्र आरोग्य कारण पुढे करत आहेत. धनंजय मुंडे आणि नैतिकता यांची कधीच भेट झालेली नाही,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत धनंजय मुंडेंसह राज्य सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. “वृत्तवाहिन्यांनी स्व. संतोष देशमुख यांना मारहाण होत असतानाचे फोटो प्रसारीत केले आहेत. हे फोटो पाहताना कोणत्याही संवेदनशील माणसाचा संताप झाल्याशिवाय राहणार नाही. हे फोटो पाहताना किती क्रूरपणे ही हत्या झाली असावी याचा अंदाज येतो. ही घटना आणि त्यातील क्रौर्य प्रचंड अस्वस्थ करणारे आणि माणूसकीला काळीमा फासणारे आहे. याप्रकरणी ज्या शक्तींचा वारंवार उल्लेख होत आहे त्या शक्तींवर कारवाई झालीच पाहिजे. उभा महाराष्ट्र आज देशमुख कुटुंबीयांच्या न्याय्य मागणीच्या मागे ठामपणे उभा आहे. स्व संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जनभावना लक्षात घेऊन जनतेला आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यांना माझी नम्र विनंती आहे की कृपया आपण या घटनेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती आणि त्यांच्या सुत्रधारांवर कारवाई करावी.”अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर निशाना साधला.