
फोटो सौजन्य - Social Media
राज्य शासनाच्या नियमांनुसार वन्यजीवांकडून पिकांचे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्यांनी वन विभागाकडे अर्ज सादर केल्यानंतर नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र, पातूर तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी गेल्या एप्रिल महिन्यापासून या अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. चालू आर्थिक वर्षात तालुक्यातील एकूण १,३४९ शेतकऱ्यांनी वन्यजीवांमुळे झालेल्या पीक नुकसानीचे अर्ज सादर केले होते. त्यापैकी ८९६ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ २५१ शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई मिळाली असून उर्वरित शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्या रब्बी हंगाम सुरू असून हरभरा, तूर, गहू, कांदा यांसारखी पिके शेतात उभी आहेत. अशा परिस्थितीत वन्यजीवांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पिकांची नासधूस होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतात पहारा द्यावा लागत आहे. अनेक शेतकरी रात्री शेतातच मुक्काम करत असून त्यामुळे त्यांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रानडुक्कर, नीलगाय, हरिण यांसारख्या वन्यजीवांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. काही ठिकाणी तात्पुरते कुंपण, विद्युत दिवे, आवाज निर्माण करणारी साधने, प्लास्टिकच्या पट्ट्या, ढोल-ताशे, फटाके अशा विविध जुगाडांचा वापर केला जात आहे. मात्र, वन्यजीव या उपायांना सरावले असून अनेकदा या सर्व उपायांवर मात करत ते शेतात प्रवेश करतात आणि पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे.
नुकसानभरपाईची प्रक्रिया पूर्ण करूनही प्रत्यक्ष अनुदान वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. आधीच वाढती शेती खर्च, मजुरी, खत-बियाण्यांचे वाढलेले दर आणि बाजारभावातील अस्थिरता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना, नुकसानभरपाई न मिळाल्याने त्यांची कोंडी होत आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी असून अनुदान मिळेल या आशेवर त्यांनी पुढील शेतीचे नियोजन केले होते. मात्र, महिन्यांपासून प्रतीक्षा करूनही निधी न मिळाल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
वन्यजीवांचा वाढता त्रास आणि नुकसानभरपाईतील विलंब यामुळे शेतकरी वर्गात संतापाची भावना आहे. तालुक्यात वन्यजीवांमुळे होणारे पीक नुकसान थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, जसे की कायमस्वरूपी कुंपण, सौर कुंपण, वन्यजीव प्रतिबंधक योजना प्रभावीपणे राबवणे आदी मागण्या शेतकरी करत आहेत. तसेच, मंजूर असलेली वन्यजीव पीक नुकसानभरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही शेतकरी संघटनांकडून दिला जात आहे.