फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेत आरआरबी ग्रुप ‘डी’ भरती २०२६ अंतर्गत लेव्हल-१ च्या तब्बल २२ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाकडून यासंदर्भात केंद्रीय रोजगार अधिसूचना (CEN) जाहीर करण्यास मंजुरी देण्यात आली असून, ही अधिसूचना डिसेंबर २०२५ च्या चौथ्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
रेल्वे भरती मंडळामार्फत (RRB) ही भरती देशभरातील विविध झोनल रेल्वे आणि उत्पादन युनिट्ससाठी राबवली जाणार आहे. एचआरएमएस इंडेंट मॅनेजमेंट प्रणालीद्वारे पदांची गरज निश्चित करून रेल्वे बोर्डाने या २२ हजार जागांना अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे रेल्वेतील ग्रुप ‘डी’ भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.
या भरतीत ट्रॅक मेंटेनर ग्रेड–IV पदांसाठी सर्वाधिक म्हणजेच ११ हजार पदे रिक्त आहेत. याशिवाय असिस्टंट (ट्रॅक मशीन) ६००, असिस्टंट (ब्रिज) ६००, असिस्टंट (पी-वे) ३००, असिस्टंट (टीआरडी) ८००, असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल) २००, असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल) ५००, असिस्टंट (टीएल अँड एसी) ५००, असिस्टंट (सी अँड डब्ल्यू) १,०००, पॉईंट्समन-बी ५,००० तसेच असिस्टंट (एस अँड टी) १,५०० पदांचा समावेश आहे. पात्रतेबाबत सांगायचे झाल्यास, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय साधारणतः १८ ते ३६ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत उमेदवार दहावी (मॅट्रिक) उत्तीर्ण किंवा आयटीआय प्रमाणपत्रधारक असणे अनिवार्य आहे. तसेच संबंधित पदासाठी आवश्यक वैद्यकीय निकष पूर्ण करणेही बंधनकारक राहणार आहे.
निवड प्रक्रिया मुख्यत्वे संगणक आधारित लेखी परीक्षा (CBT), त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांद्वारे पूर्ण केली जाणार आहे. लेखी परीक्षेत सामान्य विज्ञान, गणित, सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती तसेच सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयांवर आधारित एकूण १०० प्रश्न विचारले जाणार असून, परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. आरआरबी ग्रुप ‘डी’ भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना संबंधित प्रादेशिक आरआरबीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. स्पर्धा मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. रेल्वेतील स्थिर, सुरक्षित आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळवण्यासाठी ही भरती दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी ठरणार आहे.






