न्याय न मिळाल्यास आत्महत्या करणार; सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
परभणी : परभणीत झालेल्या संविधानाच्या विटंबनेनंतर पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण मिळाले आणि या घटनेनंतर पोलिसांनी धरपकड करून अनेकांना अटक केली होती. या आंदोलकांपैकी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. आज दीड महिना उलटला तरीही सोमनाथच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून मोर्चा काढण्यात आला होता.
हेदेखील वाचा : पहिल्याच बैठकीत पालकमंत्री गोरेंचा धडाका; आरोग्य अन् क्रीडाधिकारी रडारवर, एसटी विभाग नियंत्रकांना नोटीस बजावण्याचे आदेश
या मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासमोर आक्रोश व्यक्त केला. ‘तुम्ही मला न्याय दिला नाही तर मी इथेच आत्महत्या करून माझा जीव देईन’, असा इशारा सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई यांनी दिला. परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी परभणीत वंचित बहुजन आघाडीकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
परभणी शहरातील शनिवार बाजार येथील मैदानापासून हा मोर्चा प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय या मोर्चात सहभागी झाले होते. हातात संविधानाचे फलक घेऊन मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, सरकार जाणूनबुजून या तीनही कुटुंबीयांना न्याय देत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
परभणीत उसळला होता हिंसाचार
परभणीमध्ये अज्ञात व्यक्तीने संविधानाचा अवमान केल्यानंतर हिंसाचार उसळला होता. यात अनेक भागांतून जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. परभणी हिंसाचारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने राज्यात खळबळ उडाली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत होता. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायिक समितीच्या देखरेखीखाली त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं असून, शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे.
हेदेखील वाचा : प्रभादेवी परिसरातील सहा पुनर्विकासाच्या कामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी, मुंबईकरांना मिळणार प्रशस्त घरं