File Photo : Solapur Meeting
सोलापूर : सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार समाधान अवताडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्यावर टक्केवारीचा तर जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कारभाराचे ‘पोस्टमार्टम’ करून त्यांना कडक शब्दांत सुनावले. दुसरीकडे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हे व्हीसीद्वारे सहभागी होत एसटी महामंडळाच्या कारभारावर बोट दाखविले असता एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक बैठकीत अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश पालकमंत्री गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री गोरे यांनी पहिल्याच नियोजन समितीच्या बैठकीत आपल्या कामाची कार्यशैली व आक्रमकता दाखवून दिली. आरोग्य विभागात टक्केवारी दिल्याशिवाय कामेच होत नसल्याची तक्रार आमदार आवताडे यांनी केली. शिवाय डॉक्टरांच्या भरतीत जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी एक एक लाख रुपये घेतल्याचा आरोपही अवताडे यांनी केला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करत पालकमंत्री गोरे यांनी त्यांच्या कारभाराचे वाभाडेच काढले.
आरोग्य विभागाबाबत आमदार व खासदारांकडून आलेल्या तक्रारीनंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांनी कारवाई प्रस्तावित केली. आरोग्याधिकाऱ्यांनी या वर्षात दुरुस्तीसाठी एक रुपयांचा निधी डीपीसीमधून दिला नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधीची शिफारस नसताना स्वतः परस्पर निधीची वाट लावली. 11 कोटी तरतूद होती. त्यातील साडे दहा कोटींची पाच कामे स्वतःच्या मर्जीने मंजूर केली आहेत. यात काही तरी गोलमाल आहे. ती कामे कुणाच्या शिफारशीने मंजूर केली, असा सवाल आमदार आवताडे यांनी उपस्थित केला. यावर पालकमंत्री गोरे यांनी विचारले की, त्या कामांना डीपीसीची शिफारस आहे का?
सभेत मोबाईलवर बोलल्याने डॉ. नवलेंची कानउघाडणी
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या विभागावर करण्यात आलेल्या तक्रारींची चर्चा झाल्यानंतर डॉ. नवले हे मोबाईलवर बोलत असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी पालकमंत्र्यांनी त्यांना उभे करून यापुढे बैठकीत मोबाईलवर बोललेले चालणार नाही, अशी सक्त ताकीद दिली. दुसरीकडे क्रीडाधिकारी म्हणून काम करताना शरम वाटली पाहिजे, असा पानउतारा करत जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनाही कडक शब्दात सुनावले.
तुमच्या मर्जीने ही कामे केली आहेत का?
तुमच्या मर्जीने ही कामे केली आहेत का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करून हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हा क्रीडा अधिकारी पवार यांच्या कारभारावरही तक्रारी आल्या. क्रीडाधिकारी दाद देत नाहीत, त्यांना कडक शब्दांत सूचना देण्याची मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार समाधान अवताडे यांनी केली. पालकमंत्री गोरे यांनी चौकशी केली असता परस्पर निधी खर्च केल्याचे क्रीडाधिकारी पवार यांनी बैठकीतच कबूल केले. त्यावेळी सभागृह आश्चर्यचकीत झाले. यावेळी पालकमंत्र्यांनी क्रीडाधिकाऱ्यांची तर लाज काढली.