महिलांना पिंक एसटीसाठी अजूनही करावी लागणार प्रतिक्षाच; महामंडळाला 'ही' महत्त्वाची चिंता
मुंबई : महिला स्पेशल गुलाबी एसटी चालवण्याचा विचार महामंडळाने केला होता. मात्र, सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळा सोडल्या तर दिवसभर या गुलाबी बसने नेमक्या किती महिला प्रवास करतील, दिवसभर या बस रिकाम्या धावतील, असे प्रश्न निर्माण झाल्याने सध्या महामंडळाने हा प्रस्ताव बाजूला ठेवला आहे.
महिला सन्मान योजनेमुळे एसटीमधील महिला प्रावशांची संख्या वाढली आहे. दिवसाला एसटीने सुमारे 55 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी 18 ते 20 लाख महिला प्रवासी आहेत. प्रवासी संख्येच्या तुलनेत राज्यात एसटीची धाव अपुरी पडत आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना एसटीत बसण्यासाठी सीट मिळत नसल्याने उभ्याने प्रवास करावा लागतो. याशिवाय, सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेस तर महिला प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे महिला प्रवाशांकरिता स्पेशल एसटी चालवण्याची मागणी समोर आली होती.
हेदेखील वाचा : ‘या’ कारणामुळे पेण बस स्थानकात प्रवाशांचे हाल ! ग्रामीण भागातील अनेक एसटी बस फेऱ्या रद्द
दरम्यान, वाढत्या महिला प्रवासी संख्येला केंद्रस्थानी ठेवून महिला स्पेशल अर्थात पिंक एसटी सुरू करण्याची चाचपणी महामंडळाने केली. त्यानुसार, राज्यातील सर्वच २५० आगारांमध्ये पिंक एसटी चालवण्याचा विचार केला. या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासणी करण्याचा निर्णय घेतला. व्यवहार्यता तपासताना महिला प्रवाशांची संभाव्य संख्या, मार्गावरील महिला प्रवासी भारमान, महिलांच्या प्रवासाची वेळ याबाबत सविस्तर आढावा मांडण्यात आला.
…म्हणून प्रस्ताव पडला बाजूला
गुलाबी बसला दिवसभर महिला प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल का, दिवसभर महिला प्रवासी मिळाल्या नाहीत तर या बस तोट्यात चालवाव्या लागतील असे अनेक प्रश्न उद्भवल्याने महामंडळाने पिंक एसटीचा प्रस्ताव बाजूला ठेवला आहे.