'या' कारणामुळे पेण बस स्थानकात प्रवाशांचे हाल ! ग्रामीण भागातील अनेक एसटी बस फेऱ्या रद्द
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अधिवेशन रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे असल्याने या अधिवेशनामुळे पेण बस स्थानकातील ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे ऐन लग्नसराईमध्ये प्रवाशांचे फार हाल झाले आहेत.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे वार्षिक अधिवेश माणगाव येथे पार पडत असल्याने त्यासाठी संघटनेच्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात रजा घेतल्या आहेत. पेण बस स्थानक जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या बस स्थानकातून दररोज मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच अलिबाग, मुरुड, महाड, माणगाव रोहा, येथे शेकडो प्रवासी नोकरी व शिक्षणानिमित्त प्रवास करतात. परंतु एसटी कामगार संघटनेचे अधिवेशन माणगाव येथे असल्याने पेण बस स्थानकातील अनेक चालक व वाहक तसेच कंट्रोलर यांनी एकाच वेळी रजा टाकल्याने त्याचा परिणाम आगाराच्या दैनंदिन फेऱ्यांवर झाला.
Thane News : पावसाळ्यापूर्वी महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा, केल्या ‘या’ महत्त्वपूर्ण सूचना
पेण बस स्थानकातून दररोज एकूण 56 फेऱ्या चालविल्या जातात. परंतु सोमवारी यापैकी 14 फेऱ्या रद्द करण्यात आल्याने 42 फेऱ्या सकाळी सुरू होत्या. तर दुपारनंतर ग्रामीण भागातील तसेच नागोठणे, पाली, पनवेल, खोपोली या मार्गावरील देखील काही फेऱ्या चालक व वाहकां अभावी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ऐन लग्नाच्या हंगामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले आहे.
वास्तविक एसटी कामगार संघटनेचे हे राज्य अधिवेशन होते. त्यामुळे संपूर्ण राज्यातील चालक व वाहक, तसेच एसटी कर्मचारी या अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. असे असताना केवळ संघटनेच्या काही पुढाऱ्यांनी जाणीवपूर्वक पेण डेपोतील कर्मचाऱ्यांना एकदाच रजा घ्या असा फतवा काढला. त्यामुळे पेण आगारातील 50 चालक वाहक व कंट्रोलर यांनी रजा घेतल्या. त्याचा मोठा परिणाम आगाराच्या उत्पन्नावर तर झालाच. पण यात प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागला.
निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत; आमदार सुनील शेळके यांचा ‘जनता दरबार’
केवळ संघटनेचे अधिवेशन असल्यामुळे अशा प्रकारे एकदाच रजा घेऊन ऐन लग्नसराई व सुट्टीच्या हंगामात प्रवाशांना वेटीस धरणे हे योग्य आहे का? असा सवाल आता प्रवासी वर्गाने केला आहे. त्याबद्दल तीव्र संताप प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बंडू खंडागळे यांनी व्यक्त केला असून एवढ्या कर्मचाऱ्यांना एकदाच रजा कशा दिल्या जातात? असा सवालही त्यांनी केला आहे.