राज्यात पावसाचा जोर कायम; 'या' पाच जिल्ह्यांना सलग चार दिवस 'यलो अलर्ट'
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसा कडक उन्ह तर नंतर पावसाची सुरुवात होत आहे. असे असताना आता राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती दिली जात आहे. कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईत बुधवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यातच आता पुढील चार दिवस हा पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली. बुधवारपासून पुढील चार दिवस कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे जिल्ह्यात बुधवार तसेच शुक्रवार, शनिवार यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच नाशिकमध्येही बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अहमदनगरमध्ये बुधवार, शुक्रवार, शनिवार तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच सांगली व सोलापूरमध्येही विजेच्या कडकडाटासह परतीचा पाऊस धडकणार असल्याचे हवामान खात्याने मंगळवारी सांगितले.
वर्ध्यात सोयाबीनी 40 पोती गेली वाहून
वर्ध्यात सोयाबीनचे पीक घरी घेऊन जात असताना शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर सोयाबीनसह पुरात वाहून गेला. वर्ध्यातील आष्टी तालुक्याच्या शिरकूटणी येथे घटना घडलीये. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील शिरकुटणी या गावातील शेतकरी पुरुषोत्तम नागदेवते याने आपल्या सोयाबीनचे पीक काढले.
अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार
मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असतानाच, रायगड जिल्ह्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. अंबरनाथमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. जवळपास अर्धा ते पाऊण तास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.
मुंबईसह उपनगरांतही पावसाची हजेरी
मुंबईसह उपनगरांतही पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तर संध्याकाळी सहा वाजताच अंधार पडला होता. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.