
jaswant singh dalal in good luck jerry
साधना राजवाडकर, मुंबई: ‘गुड लक जेरी’बाबत जसवंत सिंग सांगतात की, मी या चित्रपटामध्ये टिम्मीचं पात्र साकारतोय. टिम्मी एक गँगस्टर आहे. ड्रग लॉर्ड आहे. पण तो मनाने खूप वेगळा आहे. चित्रपटामध्ये जान्हवी कपूर, दिपक डोब्रियाल,सुशांत सिंग, मिता वशिष्ठ, साहिल मेहता, नीरज सूद हे कलाकारदेखील आहेत. फिल्मच्या प्रिमायसेसबद्दल सांगायचं तर ही जेरीची जर्नी आहे. तिला एका वेगळ्या कामासाठी पैसे कमवायचे आहेत. मग ती गँगस्टरकडे येऊन काम मागते. तिथे तिला टिम्मी भेटतो. त्यावेळी ती ड्रग्सच्या जाळ्यात कशी अडकते आणि कशी बाहेर पडते त्याची ही कहाणी आहे. खूप इंट्रेस्टिंग आणि हसवणारा असा हा सिनेमा आहे.
जान्हवी कपूर प्रगल्भ अभिनेत्री
जान्हवीसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी विचारलं असता जसवंत सिंग यांनी सांगितलं की वयाच्या मानाने जान्हवी खूप प्रगल्भ अभिनेत्री आहे. ती कामाविषयी मॅच्युअर्डपणे विचार करणारी प्रामाणिक अभिनेत्री आहे. कुठे थांबायचं आणि कुठे पुढे जायचं हे तिला व्यवस्थित माहिती आहे. ती खूप काही शिकतेय. ती खूप पुढे जाईल असं वाटतं.
शुटींगचा अतरंगी अनुभव
चित्रपटाच्या शुटींगच्या वेळच्या अनुभवाविषयी जसवंत सांगतात की, पंजाबमध्ये या चित्रपटाचं शुटींग झालं आहे. सगळी रिअल लोकेशन्स आहेत. पंजाबमध्ये कडाक्याच्या थंडीत शूट करणं खूप अवघड होतं. या चित्रपटात माझ्या मानेला एक पट्टा लागलेला दाखवला आहे. कारण मानेला जखम झाली आहे असं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. तो मानेचा पट्टा घालून वावरणं थोडं कठीण गेलं. मला चित्रपटाचं काम झाल्यानंतरही काही काळ फिजिओथेरपी घ्यावी लागली. तो एक अतरंगी म्हणावा असा अनुभव होता. चित्रपटाच्या संपूर्ण क्रूसोबत काम करताना मजा आली. खूप खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही काम केलं आहे. पॅन्डेमिकच्या काळात २ महिने शुटींग करत होतो पण सेटवर कधीच तणावाचं वातावरण नव्हतं. एकमेकांची काळजी घेत, हसतखेळत शुटींगचं काम झालं. चित्रपटाचं शुटींग १० जानेवारीपासून साधारण १७ मार्चपर्यंत सुरु होतं. त्यात मी २२ ते २३ दिवस शुटींग केलं. आमचे डिओपी रंगाराजन यांनी खूप छान शूट केलं आहे त्या सगळ्या लोकेशन्सवर. त्यामुळे चित्रपट बघताना प्रेक्षकांना खूप मजा येईल.
गुड लक जेरीच्या आधी जसवंत यांनी ‘एनएच १०’ या चित्रपटामध्ये काम केलं होतं. त्यानंतर थिंकीस्तान या वेबशोमध्येही त्यांनी काम केलं आहे. आता गुड लक जेरीकडून मला खूप अपेक्षा आहेत. प्रेक्षकांनी प्रेम दिलं तर अभिनय क्षेत्रातील करिअरची पुन्हा एक चांगली सुरुवात माझ्या आयुष्यात होऊ शकते, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
जसवंत यांनी ॲड फिल्म्ससाठी प्रोड्युसर म्हणूनही काम केलं आहे. त्याविषयी ते सांगतात की, बिहाइंड द कॅमेरा काम केल्यानं तुम्हाला सगळ्या गोष्टींची जाणीव होते. मात्र मुळात मी एक ॲक्टर आहे. एफटीआयआयमधून मी ॲक्टींगचं प्रशिक्षण घेतलं आहे. पुढेही मला ॲड फिल्म्स करायला आवडेल पण आता अभिनेता म्हणून ॲड फिल्म्स करेन.
फनी डायलॉग आणि फनी मीम्स
मीम्सविषयी जसवंत सांगतात की, ट्रेलरमधल्या डायलॉगवरून जे मीम्स तयार झाले आहेत ते बघून मलाही खूप हसायला येतं. एका सीनमध्ये माझे सहकलाकार मोमोजचा चुकीचा उच्चार करत आहेत. मी त्यांना नीट उच्चार करायला सांगतो. त्याच्यावरून एक मीम आलं होतं की ज्यात माझे सहकलाकार म्हणतायत की ‘पाजी वो कलंक बेचती है. मी विचारतो “की बेचती है ?” पुन्हा तो उत्तर देतो की कलंक बेचती है. मग मी पुढे सांगतो की, ‘वो कलंक नही कलाकंद बेचती है ”. तुमच्या एखाद्या डायलॉगवरून मिम बनतात तेव्हा आनंदही होतो.
खरंतर गुड लक जेरी हा तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. मात्र आमचे डायरेक्टर सिद्धार्थ सेन यांनी फिल्मला जो टेक दिलाय तो प्रचंड वेगळा आहे. आमचे लेखक पंकज यांनी खूप फनी डायलॉग्स लिहिले आहेत.
दिग्दर्शकांकडून पेशन्सची शिकवण
गुड लक जेरीच्या दिग्दर्शकाविषयी जसवंत सांगतात की, सिद्धार्थ सेन एक चांगले ॲड फिल्म मेकर आणि खूप चांगले दिग्दर्शक आहेत. सिद्धार्थ सेन यांच्याकडून मी पेशन्स कसा ठेवायचा हे शिकलो. चित्रपटामध्ये इतकी मोठी स्टारकास्ट असताना त्यांना सांभाळून चित्रपट ज्या दिशेकडे जातो त्या दिशेकडे नेणं ही सोपी गोष्ट नाही. इतकं सगळं करत असताना रागावर नियंत्रण ठेवणं आणि डोकं शांत ठेऊन सगळ्यांना समजावणं हे सगळं ते खूप छान हँडल करत होते.
राजकुमार राव, विजय वर्मा, सनी हिंदुजा, जतिन गोस्वामी, गौरव शर्मा, जयदिप, हे सगळे माझे एफटीआयआयमधले बॅचमेट. ते सगळे आता अभिनयाच्या जोरावर प्रसिद्ध झाले आहेत. तिर्था मुरबाडकर, शिंजीनी या मुलीही उत्तम काम करत आहेत. आमची मजा मस्ती तर सुरु असायची पण इतके दिग्गज सोबत असल्यावर तुम्हाला शिकायलाही मिळतं. आजही आम्ही भेटतो. चित्रपटाविषयी बोलतो. कुणाचा चित्रपट येणार असेल तर त्याला प्रोत्साहन देतो. हे सगळे लोक मेहनत करून खूप पुढे गेले आहेत. ते पाहून आनंद होतो. मीसुद्धा त्याच वाटेवरून चाललोय. प्रेक्षक गुड लक जेरीला चांगला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे.
पॅन्डेमिकच्या काळात लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली. लोक हसणं विसरले आहेत. गुड लक जेरी लाईट मुव्ही आहे. यात चांगला ड्रामा आणि कॉमेडी आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हा चित्रपट एन्जॉय करतील. ट्रेलरमध्ये दाखवलेत ते एक दोन अपशब्द सोडले तर संपूर्ण चित्रपटामध्ये फक्त विनोदच आहे. क्राईम कॉमेडी असल्याने हा चित्रपट लोकांना खूप आवडेल.
आगामी प्रोजेक्ट्स
गुड लक जेरीनंतर ॲमेझॉनसाठीच्या एका वेब शोमध्ये मी काम करणार आहे ज्याचं नाव आहे ‘फर्जी’. राज आणि डिके डायरेक्टर आहेत ज्यांनी फॅमिली मॅन बनवला आहे. या शोमध्ये विजय सेतुपती आणि शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत, असं जसवंत म्हणाले.