लग्न न करता वयाच्या ४५व्या वर्षी आई बनली ही अभिनेत्री, 'सिंगल मदर' म्हणून करतेय लेकीचा सांभाळ
बॉलिवूडच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटात आमिर खानसोबत ‘या’ अभिनेत्रीनं काम केलं आहे. ही दुसरी तिसरी अभिनेत्री कोणीही नसून अभिनेत्री साक्षी तनवर आहे. साक्षी तन्वर ही टीव्ही जगतातील एक उत्तम अभिनेत्री आणि रॉकस्टार आहे. प्रत्येक कलाकाराला इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी स्ट्रगल करावं लागतं. एका चित्रपटातून असो किंवा मालिकेतून मिळालेली प्रसिद्धी असो ती शेवटपर्यंत टिकवून ठेवावी लागते. IAS होण्याचं स्वप्न उराशी बाळगून साक्षी तनवर दिवस रात्र मेहनत करत असताना तिला नशिबाने सिनेसृष्टीत आणलं.
१२ जानेवारी १९७३ रोजी साक्षी तनवरचा जन्म झाला आहे. राजस्थानमध्ये लहानाची मोठी झालेली साक्षी एका अतिशय शिक्षित कुटुंबातील आहे. साक्षीचे वडील सीबीआय ऑफिसर होते. तिच्या घरात सुरुवातीपासूनच शैक्षणिक वातावरण होतं. साक्षी शिक्षणात अतिशय हुशार होती. तिला IAS बनायचं होतं. ग्रॅज्युएशनचं शिक्षण दिल्लीत पूर्ण झाल्यानंतर साक्षी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेजची (IAS) तयारी करत होती. स्पर्धा परिक्षेची तयारी असताना अभिनेत्रीने पॉकेटमनीसाठी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सेल्स ट्रेनी म्हणून नोकरी केली. एक दिवस मित्राच्या सांगण्यावरुन साक्षीने दूरदर्शनवरील ‘अलबेला सुर मेला’ शोसाठी ऑडिशन देण्यासाठी गेली होती.
१९९८ मध्ये याच शोसाठी साक्षीची प्रेजेंटर म्हणून निवड करण्यात आली. आणि याच शोपासून तिच्या फिल्मी करियरची सुरुवात झाली. खरंतर, ‘अलबेला सुर मेला’ हा शो साक्षीसाठी खूप खास ठरला. या शोमधून मिळालेल्या प्रसिद्धीतून निर्माती एकता कपूरची नजर साक्षीवर पडली आणि ‘कहानी घर घर की’ या मालिकेसाठी तिची निवड केली. एकता कपूरच्या या मालिकेतून साक्षी महाराष्ट्रातल्याच नाही तर, देशभरातल्या घराघरांत प्रसिद्ध झाली. त्यानंतर साक्षीने २०११ ते २०१४ मध्ये राम कपूरसह ‘बडे अच्छे लगते है’ मालिकेत काम केले. या मालिकेने साक्षीच्या करिअरला मोठी उंची मिळवून दिली. टीव्हीसह साक्षीने सिनेमा आणि वेब सीरिजमधूनही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. साक्षीने आमिर खानच्या ‘दंगल’ ह्या ब्लॉकबस्टर चित्रपटात आमिरच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तर, साक्षीने ‘माई’ वेब सीरिजमध्येही भूमिका साकारलीये.
साक्षी ५२ वर्षांची असून ती अद्याप अविवाहित आहे. तिने २०१८ मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेतले होते. तेव्हापासून ते आजवर साक्षी ‘सिंगल मदर’ची अगदी चोखपणे जबाबदारी पार पाडत आहे. तिचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत राहिलं आहे. साक्षीला अद्याप अविवाहित असल्याचं कारण तिला विचारलं असता, ‘मला असा कोणीही जीवनसाथी मिळाला नाही, ज्याच्यासोबत मी माझं संपूर्ण आयुष्य घालवू शकेल. मला वाटतं तुमचा जन्म, मृत्यू, लग्न अशा सर्व गोष्टी आधीच ठरलेल्या आहेत. माझा लग्नावर विश्वास नाही असं अजिबातच नाही. मी माझ्या आसपास अनेक जोड्यांचे संसार यशस्वी झालेले पाहिले आहेत.”