akshay kumar
या चित्रपटातील तुझा लूक हा अंगावर भीतीचा काटा निर्माण करणारा आहे. तू तो कसा साकार केलास?
मी यापूर्वीही काही नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या आणि प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वात नकारात्मकतेचा एक भाग असतो, हे मला समजून चुकलं आहे. त्यामुळे पडद्यावर नकारात्मकता साकारताना तुम्हाला तुमच्यात दडलेली नकारात्मकता बाहेर काढायची असते. यात फक्त एकच मोठी समस्या होती की माझ्या दगडाच्या डोळ्यासाठी मला एक भलं जाड भिंग लावावं लागत होतं. मी आजवर साकारलेल्या कोणत्याही व्यक्तिरेखेपेक्षा यातील माझा लूक अगदी भिन्न होता. तो अंगावर चढवणं हे एक काम होतं.
कृती सनोन आणि अर्शद वारसीबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता?
कोणतीही व्यक्तिरेखा समजून घेणं आणि तिच्या अंतरंगात प्रवेश करणं हे नेहमीच सोपं नसतं. पण कृती ही गोष्ट अगदी सहजपणे करू शकते. तिच्या व्यक्तिरेखेबद्दल ती कायम लक्ष केंद्रित करते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अर्शदबद्दल म्हणालं तर तो तर त्यात तज्ज्ञच आहे. तो सेटवर नेहमीच अगदी निवांत आणि मजेत असतो. त्याच्याकडे पाहून तुम्हाला हेवा वाटतो. आमची सर्व टीम जेसलमेरमध्ये एकत्र चित्रीकरण करीत होती. तुम्ही सर्वजण एकत्रितपणे जेव्हा इतका काळ एकत्र व्यतीत करता तेव्हा तुम्ही कळत-नकळत काहीतरी शिकत असता, काही गोष्टी सोडून देत असता. जसं आपण आपल्या कुटुंबाकडून शिकतो.
तुझ्या दृष्टीने बच्चन पांडे कशाचं प्रतीक आहे ?
हा एक व्यावसायिक मसालापट आहे आणि मी अशा प्रकारचा चित्रपट बऱ्याच काळानंतर करीत होतो. माझ्या दृष्टीने हीच बाब खूप उत्कंठावर्धक होती. शिवाय बऱ्याच काळानंतर मी एक नकारात्मक भूमिका रंगवत होतो आणि ती साकारताना मला खूप मजा येत होती. माझ्या दृष्टीने ती भूमिकाही महत्त्वाची होती, कारण सुरुवातीला तो दुष्टपणा करतो, पण कथा जसजशी उलगडत जाते, तसतसे तुम्ही या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडता.
चित्रपटसृष्टीतील तू एक सर्वाधिक व्यग्र अभिनेता आहेस. तुझ्या यशाचा मंत्र कोणता?
लोक मला म्हणतात की, एका वर्षात तू इतके चित्रपट का स्वीकारतोस? पण जीवनात मी तीन गोष्टी शिकलो आहे- काम, कमाई आणि कर्म. मी खूप कष्ट घेतो. कारण मला अधिक कमाई करायची असेल, तर मला अधिक कष्ट घ्यावे लागतील. माझ्याकडे चालून येणाऱ्या भूमिकेला मी कधी नाकारीत नाही. कोणतीही भूमिका असो, कोणताही कार्यक्रम असो, कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करायची असो. क्योंकि काम से आती है कमाई और उससे मैं कोशीश करता हूँ अच्छे कर्म करने की. त्यामुळे तुम्ही जितकं जास्त काम कराल, तितके अधिक पैसे कमवाल. आणि नंतर त्या कमाईतूनच तुम्ही समाजाला काहीतरी परत करता. यात काही चुकीचं आहे, असं मला वाटत नाही.