अरारारा... खतरनाक, वरुण धवनने चाहत्यांना दिले जबरदस्त ख्रिसमस गिफ्ट; 'Baby John'चा ॲक्शन टीझर पाहिलात का ?
अभिनेता वरूण धवन (Actor Varun Dhawan) सध्या ‘बेबी जॉन’ (Baby John) चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने ऐन दिवाळीतच आपल्या चाहत्यांना ख्रिसमसचं गिफ्ट देऊन टाकलं आहे. त्याचा आगामी चित्रपट येत्या ख्रिसमसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरुण धवनच्या आगामी चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला आहे. धडाकेबाज ॲक्शन आणि काही सीन्सने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वरूण धवन, किर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. जिओ सिनेमाच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली असून कलीसने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, चित्रपटाची निर्मिती प्रिया ॲटली, ज्योती देशपांडे आणि मुद्रा खेतानी यांनी केली आहे. काही तासांपूर्वीच हा टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला असून चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. १ मिनिट ५७ सेकंदाच्या टीझरमध्ये प्रेक्षकांना रोमान्स, धडाकेबाज ॲक्शन्स आणि काही भावनिक सीन्स पाहायला मिळतील. टीझरमध्ये, वरूण धवन किर्ती सुरेश आणि वामिका गब्बीसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
पहिल्यांदाच वरुण केव्हाही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात वरुण धवन पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तो दुहेरी भूमिकेतही दिसणार आहे. चित्रपटातल्या जॅकी श्रॉफच्या भूमिकेचीही एकच चर्चा होते. जॅकी श्रॉफने चित्रपटात खलनायकाचे पात्र साकारले. त्यांच्या लूकनेच चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे. मास एंटरटेनर असलेल्या ह्या चित्रपटात सर्वच कलाकारांच्या कोणत्या पद्धतीच्या भूमिका असणार ? हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता आहे. ‘बेबी जॉन’ हा तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. अॅटलीने दिग्दर्शित केलेल्या ‘थेरी’ चित्रपटाचा ‘बेबी जॉन’ रिमेक आहे. अलीकडेच अॅटली म्हणाला होता की, ‘बेबी जॉन’ ‘थेरी’ चित्रपटाचा रिमेक असला तरी कथेत एक ट्विस्ट जोडला आहे.