सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातून एकाला केली अटक
अभिनेता सैफ अली खानच्या घरात १६ जानेवारीला एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर अभिनेत्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. आता त्याची प्रकृती बरी असून आयसीयूमधून स्पेशल रूममध्येही शिफ्ट करण्यात आले. अभिनेत्याच्या हल्लाप्रकरणाला दोन दिवस उलटले असून पोलिस अजूनही अभिनेत्याच्या हल्लेखोराचा शोध घेत होते, आता या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
सैफच्या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला मध्यप्रदेशातून अटक करण्यात आलेली आहे. सध्या पोलिस संशयिताची कसून चौकशी करीत असून अटक केलेली व्यक्ती मारेकरी आहे का हे सुद्धा पोलिसांकडून अद्याप समजू शकलेलं नाहीये. सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा युद्धपातळीवर शोध घेतला जात असून याप्रकरणी पोलिसांची ३५ पथके मुंबईसह आजुबाजुच्या वेगवेगळ्या शहरांत रवाना करण्यात आली आहेत. सैफवर हल्ला करणाऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केले होते, त्यानंतरचे त्याचे वांद्रे आणि दादरमधील फोटो समोर आले होते. आता या प्रकरणी एका संशयिताला मध्य प्रदेशातून ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
सैफवर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोर वर्सोवामध्ये शूज चोरत होता, संशयिताचे नवीन CCTV फुटेज समोर
सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणाला दोन दिवस झाले आहेत, तरीही अद्याप आरोपी मोकाटच आहे. आरोपीला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी ३५ पथकं मुंबई आणि उपनगरांमध्ये तैनात केली आहेत. अभिनेत्यावर हल्ला केल्यानंतर बाहेर पडल्यावर हल्लेखोराने कपडे बदलले होते. हल्ला केल्यानंतर आरोपी दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही कैद झाला होता. त्याआधारे मुंबई पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली आणि त्याआधारे पोलिसांनी आपला तपास सुरू केला होता. घुसखोराचे एक ताजे सीसीटीव्ही फुटेज काल समोर आले होते, ज्यामध्ये हल्लेखोराने अभिनेत्यावर हल्ला केल्यानंतर दादरमधील एका दुकानातून हेडफोन खरेदी करत होता.
त्यानंतर पुढे हल्लेखोर तो स्टेशनच्या दिशेने चालत गेला. आणि त्यानंतर वसई- विरारच्या दिशेची ट्रेन पकडून त्या दिशेला पळून गेला असण्याची शक्यता पोलिसांना आहे. दरम्यान, पोलिस त्याच दिशेने हल्लेखोराला पकडण्यासाठीचा तपास करीत आहेत. सैफच्या अंगावर हल्लेखोराच्या झटापटीत ६ वार लागले. त्यातील २ वार खोलवर गेले असून इतरत्र किरकोळ जखमा आहेत. हल्लेखोराच्या सोबत झालेल्या झटापटीत सैफच्या मानेला, हाताला, पाठिला गंभीर जखमा झाल्या. तसेच मानेमध्ये चाकूचे टोक घुसले होते. लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीतून चाकूचे टोक काढले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येईल.