(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची अजरामर भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. त्यांनी आज, बुधवार १५ ऑक्टोबर रोजी ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे जुने मित्र अभिनेता अमित बहल यांनी दिली.
पंकज धीर यांना काही काळापूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यांनी त्या आजारावर यशस्वीपणे मात केली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी कॅन्सरचे पुन्हा निदान झाले आणि यावेळी त्यांची तब्येत सतत खालावत गेली.उपचारादरम्यान मोठ्या शस्त्रक्रियेचाही त्यांना सामना करावा लागला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण दुर्दैवाने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वृत्तानुसार, अभिनेता पंकज धीर यांच्यावर आज (१५ ऑक्टोबर) मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र, तसेच इंडस्ट्रीतील कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जात आहेत.
पंकज धीर हे केवळ टीव्हीपुरतेच मर्यादित नव्हते. त्यांनी ‘सडक’, ‘सोल्जर’, ‘बादशाह’ यांसारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. त्यांचा भारदस्त आवाज, व्यक्तिमत्त्व आणि अभिनयाची सहजता यामुळे ते प्रत्येक भूमिकेत उठून दिसत असत.१९८८ मध्ये प्रसारित झालेल्या बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या ऐतिहासिक मालिकेमुळे पंकज धीर घराघरात पोहोचले. कर्णाची न्यायप्रिय, तेजस्वी आणि भावनिक बाजू त्यांनी प्रभावीपणे साकारली, ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांचे अढळ स्थान निर्माण झाले. आजही त्यांची ती भूमिका लोकांच्या स्मरणात ताजी आहे.
पंकज धीर यांनी केवळ ‘महाभारत’ मधील कर्णाच्याच नव्हे, तर अनेक हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. पंकज धीर यांचा मुलगा निकितन धीर हाही बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आपल्या हटके लूक, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि दमदार अभिनयामुळे हिंदी सिनेमात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
प्रिया बेर्डेचे दहा वर्षांनंतर पुनरागमन, स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’मध्ये साकारणार जबरदस्त भूमिका
निकितनने ‘जोधा अकबर’ या ऐतिहासिक चित्रपटात शरिफुद्दीन हुसैन ही भूमिका साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्याचा खऱ्या अर्थाने ब्रेकथ्रू ठरला तो ‘चेन्नई एक्सप्रेस’ मधील खलनायक तंगबलीच्या भूमिकेमुळे. या भूमिकेमुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली.