रुह बाबाला हरवायला सज्ज झाली 'मंजुलिका', दिवाळीला होणार ‘भूल भुलैया 3’चा धमाका (फोटो सौजन्य-YouTube)
या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट भूल भुलैया ३ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित हॉरर कॉमेडीची खास गोष्ट म्हणजे मंजुलिका या चित्रपटात परतली आहे. मंजुलिकाने यापूर्वी ‘भूल भुलैया’मध्ये अक्षय कुमारचा सामना केला होता आणि आता कार्तिक आर्यन त्याच्यापासून सुटका करताना दिसणार आहे. 2007 मध्ये प्रियदर्शनने ‘भूल भुलैया’ हा चित्रपट आणला जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटात विद्या बालनने मंजुलिकाची तर अक्षय कुमारने डॉक्टर आदित्यची भूमिका केली होती. परेश रावल, शायनी आहुजा, अमिषा पटेल आणि राजपाल यादव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लोकांनी खूप कौतुक केले. या चित्रपटाने चांगली कमाई देखील केली.
त्यानंतर 15 वर्षांनी 2022 मध्ये अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 2’ प्रेक्षकांच्या भेटीस आला. आणि अक्षय कुमारच्या ऐवजी अभिनेता कार्तिक आर्यन या चित्रपटामध्ये झळकला. या चित्रपटात तब्बू भुताच्या भूमिकेत दिसली होती आणि कार्तिकची जोडी कियारा अडवाणीसोबत होती. हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
‘भूल भुलैया 3’ चा टीझर आऊट
भूल भुलैया 3 मध्ये पूर्वीपेक्षा जास्त उत्सुकता आहे कारण त्यात मंजुलिका म्हणजेच विद्या बालनने पुनरागमन केले आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये मंजुलिकाची झलक दाखवण्यात आली आहे. रूह बाबाची भूमिका साकारणारा कार्तिक आर्यन मंजुलिकाची सुटका करण्याचा प्रयत्न करताना या टीजरमध्ये दिसले आहे.
रूह बाबा मंजुलिकाला पाहून घाबरला
1 मिनिट 46 सेकंदाच्या टीझरमध्ये मंजुलिका राहत असलेल्या राजवाड्याच्या खोलीचा दरवाजा उघडल्याचे दिसून येत आहे. भुतांना न घाबरणाऱ्या रूह बाबाच्या हातून जेव्हा खोलीचे दार उघडते तेव्हा मंजुलिकाच्या तांडवांमुळे त्याचे शरीर थरथर कापते. टीझरला हॉररसोबत कॉमेडीचा टच दिला आहे. कार्तिक आर्यनचा तृप्ती डिमरीसोबतचा रोमँटिक सीक्वेन्सही लक्षवेधी दिसत आहे.
हे देखील वाचा- Devara box-office : ‘देवरा’ पहिल्याच दिवशी 100 कोटींचा करणार गल्ला, बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई!
टीझर आऊट होताच लोक याला ब्लॉकबस्टर फिल्म म्हणू लागले आहेत. चाहत्यांचा या चित्रपटाच्या टीजरला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ‘भूल भुलैया 3’ मध्ये कार्तिकसोबत तृप्ती दिमरी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. माधुरी दीक्षित आणि राजपाल यादव सारखे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या दिवाळीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.