धक्कादायक! क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला, दोनदा चाकूनं वार अन् डोक्यात लोखंडी रॉडने वार
हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘क्राईम पेट्रोल’या शोमध्ये काम करणाऱ्या अभिनेता राघव तिवारी याच्यावर शनिवारी रात्री हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील वर्सोवा येथे अभिनेत्यावर अज्ञातांकडून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोरावर वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही.
अभिनेत्यावर हल्ला करणाऱ्याचं नाव आरोपी मोहम्मद जैद परवेझ शेख असं आहे. हल्लेखोराविरोधात मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ११८ (१) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून त्याच्यावर मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्यावर जीवघेणा हल्ल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांकडून त्याच्या तब्येतीची विचारपूस केली जात आहे.
जणू श्रीदेवीच, दाक्षिणात्य लुकमध्ये जान्हवी कपूरचे निखळ सौंदर्य
घडलेल्या घटनेबद्दल अभिनेता राघव तिवारीने सांगितलं की, राघव आणि त्याचा मित्र शनिवारी रात्री शॉपिंग करुन घरी परतत होता. रस्ता ओलांडत असताना तो एका दुचाकीला जाऊन धडकला. घटनेबद्दल सांगत असताना अभिनेत्याने ती त्याची चूक असल्याचे सांगितले. चूक अभिनेत्याची असल्यामुळे अभिनेत्याने लगेचंच त्यांची माफीही मागितली आणि तो पुढे निघाला. परंतू आरोपी दुचाकीस्वाराने त्याच्यावर शिवीगाळ सुरू करत चाकूने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्याने आरोपीला हल्ल्यामागील कारण विचारला असता त्याने उत्तर देणं टाळलं. राघवने हल्ल्यातून कसंतरी स्वतःला वाचवलं. यानंतर आरोपीनं त्याला लाथ मारल्यामुळे तो खाली पडला.
घडलेल्या घटनेबद्दल अभिनेत्याने पुढे सांगितलं की, आरोपीने दुचाकीच्या डिक्कीतून दारूची बाटली आणि लोखंडी रॉड काढला. राघवने स्वतःला वाचवण्यासाठी रस्त्यावरील लाकडाची काठी उचलली आणि त्याच्या हातावर वार केला. त्यामुळे हल्लेखोराच्या हातात असलेली दारूची बाटली खाली पडली. यानंतर आरोपींनी राघवच्या डोक्यात लोखंडी रॉडनं दोन वार केले, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. राघवच्या मित्रानी हल्ल्यानंतर तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेलं, तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर राघव तिवारीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अद्याप पोलिसांनी आरोपीला पकडलेलं नाही. घटनेबद्दल सांगत असताना अभिनेत्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Bigg Boss 18 : फिनालेपूर्वी फॅमिली वीकमुळे या 5 स्पर्धकांचा खेळ बिघडला, कुटूंबियांनी वाढवल्या अडचणी
अभिनेता म्हणाला की, “आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नसून ते मोकाट फिरत आहेत. आरोपी त्याच्या इमारतीच्या खाली फिरत असल्याचंही त्यानं सांगितलं. राघवनं आपल्याला किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं तर त्याची जबाबदारी पोलिसांवरच असेल, असंही म्हटलं आहे. राघव तिवारीच्या कामाबद्दल सांगायचं तर, त्याने आजवर क्राईम पेट्रोल व्यक्तिरिक्त काही वेब सिरीजमध्ये काम केलं आहे. मेरी कॉम, द पुष्कर लॉज यांसारख्या सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे.