(फोटो सौजन्य-Social Media)
आज सकाळी बॉलीवूडच्या दुनियेतून एक आनंदाची बातमी आली. जी सध्या चर्चेत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेत्याला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मिथुन यांच्या फिल्मी करिअरला 50 वर्षे झाली आहेत. या काळात त्यांनी सुमारे 18 भाषांमधील 370 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1976 मधील ‘मृगया’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट हिट ठरला आणि या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
अभिनेत्याने पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला
पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, “माझ्याकडे शब्द नाहीत. मला ना हसता येत आहे ना रडू येत आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे… मी कल्पनाही करू शकत नाही. मी खूप आनंदी आहे. मला हे माझे कुटुंब आणि जगभरातील माझ्या चाहत्यांना समर्पित करायचे आहे.” असे अभिनेत्याने सांगितले.
अभिनेत्याच्या मनात आला होता आत्महत्येचा विचार?
मिथुन चक्रवर्ती यांनी ॲक्शनपासून ते कॉमेडीपर्यंत प्रत्येक शैलीतील चित्रपट करून त्यांनी चाहत्यांची मने जिंकली. अलीकडेच, टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील एक रहस्य उघड केले जे तुम्हालाही थक्क करेल. अभिनेता म्हणाला, “मी सहसा याबद्दल फारसे बोलत नाही आणि मला बोलायचे आहे असे कोणतेही विशेष टप्पा नाही. मला त्या संघर्षमय दिवसांबद्दल बोलायचे नाही कारण ते इच्छुक कलाकारांना परावृत्त करू शकतात. मात्र प्रत्येकजण संघर्षातून जातो, परंतु माझा संघर्ष खूप मोठा होता. कधीकधी मला असे वाटले की मी माझे ध्येय साध्य करू शकणार नाही, मी आत्महत्या करण्याचा विचारही केला होता.” असे ते म्हणाले.
हे देखील वाचा- ‘मला माफ करा’, ‘खतरों के खिलाडी 14’च्या पराभवाने अभिषेक कुमारने शेअर केली भावनिक पोस्ट!
तसेच, पुढे ते म्हणाले, “काही खास कारणांमुळे मी कोलकात्याला परत जाण्याचा विचारही करू शकत नव्हतो. पण मी लोकांना सल्ला देऊ इच्छितो की कधीही लढल्याशिवाय त्यांच्या संघर्षापासून दूर पळण्याचा प्रयत्न करू नका. मी जन्मापासूनच एक फायटर आहे आणि मला हार आवडत नाही. त्यामुळेच आज इथपर्येंत पोहचलो आहे.” असे अभिनेत्याने सांगितले. मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केल्यापासून त्यांच्या चाहत्यांना देखील या गोष्टीचा खूप आनंद झाला आहे.