(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
दिवाळीच्या सणात एकामागोमाग एक दु:खद बातम्या समोर येत आहेत. गोवर्धन असरानी यांचे दिवाळीच्या दिवशी निधन झाले. त्यानंतर केवळ दोन दिवसांतच गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन याचं हृदयविकाराने निधन झालं. यापूर्वी, दिवाळीच्या पाच दिवस आधी म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचंही निधन झालं होतं.या सलग घडत असलेल्या दुःखद घटनांमुळे चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे आणि चाहत्यांमध्येही शोककळा पसरली आहे.
ऋषभ टंडन यानं केवळ गायनच नाही, तर अभिनयाच्या माध्यमातूनही आपली ओळख निर्माण केली होती.त्याने ‘फकीर: लिव्हिंग लिमिटलेस’ आणि ‘रशना: द रे ऑफ लाइट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.अत्यंत कमी वयात झालेल्या त्याच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांसह संपूर्ण कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे.ऋषभ टंडन हा मुंबईत आपल्या पत्नीसोबत वास्तव्यास होते, मात्र दिवाळी साजरी करण्यासाठी तो दिल्लीला आला होता.तिथेच, काळाने त्याला गाठले…
आपल्या कारकिर्दीत ऋषभ अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे माध्यमांत चर्चेत राहिले.तेव्हा विशेषतः तो अभिनेत्री सारा खान यांच्यासोबतच्या नात्याच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आला होता.एका प्रसंगी सारा खानच्या सिंदूर लावलेल्या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवली होती, आणि दोघांचे लग्न झाले असावे, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
विल स्मिथ करणार ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मध्ये धमाकेदार एन्ट्री? मालिकेत नवं वळण!
गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांनी एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे आणि या कठीण काळात गोपनीयतेचा आदर राखण्याची विनंती केली आहे.सध्यातरी ऋषभ याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
ऋषभ याची शेवटची सोशल मीडिया पोस्ट ११ ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवर होती, ज्यामध्ये त्याने आपल्या पत्नी ओलेस्या नेडोबेगोवा हिच्यासोबत करवा चौथ साजरा करतानाचे काही खास क्षण शेअर केले होते.