मुंबई : फेसबुक (Facebook) हॅक होण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता सेलिब्रिटींचे फेसबुकं अकाऊंटस देखील हॅक होत आहे. अशातच आता झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शो मधील एका कलाकाराचं फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. अकाउंट हॅक झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांमध्ये केली असून चाहत्यांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता अंकुर वाढवे याच फेसबुक अकाउंट २४ डिसेंबर रोजी हॅक झाले होते. अकाऊंट हॅक झाल्याचं कळताच त्याने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अंकुरने सायबर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीची प्रत सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं आहे,”मित्रांनो माझं फेसबुक काही दिवसांपासून हॅक झालं आहे. त्यावर जे पोस्ट होणाऱ्या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही. बऱ्याच मित्रांनी माझ्याशी संपर्क साधत चिंता व्यक्त केली आहे”.
अंकुरने पुढे लिहिलं आहे,”त्यासंबंधी मी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काळजी नसावी… असेच पाठीशी उभे राहा..धन्यवाद. सतर्क राहा माझ्या या पेजवरून काहीही मेसेज आला तर दुर्लक्ष करा. नशिबाने अजून कोणाला तसे मेसेज आलेले नाहीत. ही माहिती माझ्या आणि तुमच्याही मित्रांपर्यंत पोहोचवा”.
अंकुर वाढवेचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले असून सदर अकाउंटवरून त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे फेसबुक अकाऊंट कोणी हॅक केलं हे अद्याप समोर आलेलं नाही. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे.