मैत्रिणीच्या मेहेंदीला गेला अन् मृत्यूने गाठलं, प्रसिद्ध कॉमेडियनचा हृदयविकारामुळे मृत्यू
टॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेता आणि कॉमेडियन राकेश पुजारी याचं निधन झालं आहे. वयाच्या ३४ वर्षी अभिनेत्याचं निधन झालं असून मैत्रिणीच्या मेहेंदीच्या कार्यक्रमामध्ये गेला असताना त्याचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. राकेशला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचाराअंती त्याची आज (१२ मे) सकाळी प्राणज्योत मालवली. अभिनेत्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
‘एका मूर्ख बाईसाठी तो…’, गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा घटस्फोटाच्या बातमीवर जरा स्पष्टच बोलली
राकेशच्या जवळच्या मैत्रिणीचा रविवारी (११ मे) रोजी मेहेंदीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला अभिनेत्याने हजेरी लावली होती. काही तिथे त्याने आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत डान्स करुन आनंद साजरा केला, आनंद साजरा केल्यानंतर अभिनेत्याची अचानक तब्येत बिघडली. त्यासोबतच शरीरातील ब्लडप्रेशर कमी झाल्यामुळे अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला. अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल सुद्धा केलं. पण उपचाराअंती राकेशचं आज सकाळी निधन झालं आहे. अभिनेता शिवराज केआर पीटने राकेशच्या निधनाची दु:खद वार्ता सर्वांना सांगितलीये. त्याने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या नव्हती.
अभिनेता आणि कॉमेडियन राकेश पूजारीचे निधन ३४ वर्षी झाले आहे. इतक्या कमी वयात अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे चाहत्यांकडून दु:ख व्यक्त केले जात आहे. त्याच्या निधनाने टॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. टॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी मित्रांनी आणि त्याच्या कुटुंबीयांनीही त्याच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे. “ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिला अशा व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभो…” अशा शब्दात शिवराजने सोशल मीडियावर राकेशला श्रद्धांजली वाहिली. राकेश हा कन्नड मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता होता. राकेशला ‘कॉमेडी खिलाडी’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून लोकप्रियता मिळाली.
राकेशच्या मागे त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि छोटी बहीण आहे. राकेशच्या अकस्मात निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कॉमेडियन राकेशच्या निधनामुळे त्याचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.